शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:27 PM

1 / 11
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यात पक्षांतरं करणाऱ्या नेत्यांची संख्या अधिक आहे. एकाच घरात २ पक्ष, त्यात आमदार, खासदार ही पदे एकाच घरात असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात हे दिसून येत आहे.
2 / 11
ठाकरेंसोबत पवार कुटुंबही राजकारणाचं केंद्र बिंदू राहिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबात शरद पवार राज्यसभेचे खासदार, सुप्रिया सुळे लोकसभेच्या खासदार, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार तर रोहित पवार हे गेल्या निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून आलेत.
3 / 11
सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील यांचं वर्चस्व, विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. तिथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून खासदार झाले. तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाचे आमदार होते. यंदाच्या निवडणुकीत ते पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
4 / 11
कोकणात राणे कुटुंबाचं वर्चस्व आहे, याठिकाणी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून नारायण राणेंना तिकिट दिले, महायुतीकडून ते खासदार झाले. तर कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांना पुन्हा भाजपाची उमेदवारी मिळाली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत.
5 / 11
लातूरचं राजकारण देशमुख कुटुंबाशिवाय पूर्ण होत नाही. विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते. तर त्यांची दोन्ही मुले आमदार आहेत. अमित देशमुख हे मविआ काळात मंत्रीही होते. धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोघेही २०१९ च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेत. २०२४ ला पुन्हा या दोघांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
6 / 11
शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रि‍पदाची माळ पडली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी सलग तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदारसंघात बाजी मारली. आता येणाऱ्या विधानसभेत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
7 / 11
नवी मुंबईच्या राजकारणात नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे. गणेश नाईकांपासून संजीव नाईक, संदीप नाईक सगळेच यात पुढे आहेत. गणेश नाईक हे विद्यमान भाजपाचे आमदार आहेत. ते पुन्हा ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. संजीव नाईक हे ठाण्याचे माजी खासदार आहेत. तर संदीप नाईक यांनी बेलापूर मतदारसंघात भाजपाची उमेदवारी न मिळाल्याने आता राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
8 / 11
बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंब राजकारणात आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली. मात्र काही मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागली. मुंडे घराण्यातील आणखी एक नाव म्हणजे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. पक्षातील फुटीनंतर ते अजितदादांसोबत आले. त्यामुळे परळी विधानसभेत पुन्हा एकदा महायुतीकडून ते निवडणुकीत उभे राहणार आहेत.
9 / 11
रायगडच्या राजकारणात तटकरे कुटुंब खूप सक्रीय आहे. स्वत: सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत. तर मुलगी आदिती तटकरे गेल्यावेळी श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आली. मागील ५ टर्म ती मंत्री म्हणून राज्यात कार्यरत आहेत. तर तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत.
10 / 11
राज्याच्या राजकारणात सर्वात चर्चेत असणारे घराणे म्हणजे ठाकरे-पवार, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २०१९ च्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करत राज्याचं मुख्यमंत्रिपद पटकावलं. त्यात उद्धव ठाकरे विधान परिषदेवर आमदार झाले, तर आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडून आले.
11 / 11
नाशिकचं राजकारण भुजबळांशिवाय पूर्ण होत नाही. छगन भुजबळ हे राज्याचे मंत्री आणि येवला मतदारसंघाचे आमदार आहेत. येत्या निवडणुकीत ते पुन्हा उभे राहिलेत. त्यात पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळाली आहे तर समीर भुजबळ येत्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेChhagan Bhujbalछगन भुजबळNarayan Raneनारायण राणे Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदे