एक राज्य, एक युती अन् एक आवाज!; महाराष्ट्राचं मैदान जिंकण्यासाठी NDA ची काय योजना? By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 2:49 PM
1 / 10 आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ६ प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. परंतु भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) लोकसभा निवडणुकीची सुमार कामगिरी लक्षात ठेवत विधानसभेला एकजूट आणि मजबूत युती दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. 2 / 10 भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेतली. त्यात पक्षाकडून ११५ ते १२० जागांवर चर्चा झाली. त्याशिवाय या बैठकीत २८८ मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. ज्यात मित्रपक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या जागांचाही आढावा घेतला गेला. 3 / 10 कोणत्या जागेवर युतीचा घटकपक्ष ताकदीचा आहे यावर एकंदरीत चर्चा झाली. महायुतीत २४० जागांवर एकमत झालं असून उर्वरित ४८ जागांबाबत पुढील काही दिवसांत निर्णय घेतला जाईल असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत भाजपाचे विद्यमान खासदार किंवा लोकसभेत पराभूत झालेले, तिकीट न मिळालेले यांना उतरवण्याचं कुठलेही प्लॅनिंग नसल्याचंही समोर आले आहे. 4 / 10 बुधवारी केंद्रीय निवडणूक समितीची जी बैठक झाली, त्यानंतर दुसरी बैठक होण्याची शक्यता नाही. तिकिटांबाबत पुढील निर्णय घेण्याचे अधिकार पक्षातील राज्यातील नेत्यांना देण्यात आले आहेत. युतीत जागावाटप हे विभागवार कुणाची किती जास्त ताकद आहे त्याआधारे केले जाईल. उदा. मराठवाड्यात शिवसेना जास्त जागा लढवेल, भाजपा आणि राष्ट्रवादी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईवर लक्ष केंद्रीत करेल. 5 / 10 विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला सोडण्यात येणार आहेत, त्यामुळे शिंदेसेना-ठाकरेसेना आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आमनेसामने लढत होण्याची शक्यता आहे. बहुतांश जागांवर भाजपा आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होऊ शकते असं पक्षातील प्रवक्त्यांनी म्हटलं. 6 / 10 काय आहे रणनीती? - लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्याचा महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न आहे. प्रादेशिक पक्षात फूट आणि त्यातील २ गट एनडीएसोबत आले, मतदारांना हे आवडलं नाही. नेते आले परंतु मते ट्रान्सफर झाली नाहीत. विधानसभेला ही मते मिळवण्यासाठी महायुती सरकारनं गेल्या ४ महिन्यात विविध लोकोपयोगी योजना, प्रकल्प पुढे आणले आहेत. 7 / 10 उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरी उघडपणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाकडून ग्राऊंड लेव्हला आधीपासून काम करण्यात येत आहे. पुढील २४ ते ४८ तासांत उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. महायुतीचे तिन्ही पक्ष एकाचवेळी यादी जाहीर करू शकतात. 8 / 10 गेल्या अडीच वर्षाच्या सरकारच्या कामगिरीबाबत महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली तसा प्रचार येणाऱ्या काळात होणार आहे. राज्यातील तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित संयुक्त सभा घेतील. केंद्रीय नेतेही युतीच्या प्रचाराला येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील सहा विभागात सहा रॅली घेतील, दिवाळीनंतरच या रॅलीला सुरूवात होईल अशी माहिती आहे. 9 / 10 भाजपासाठी त्यांची शक्ती RSS आहे जी लहान-मोठ्या बैठका घेत राहते - कधीकधी कौटुंबिक स्तरावर आणि ते अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. हरयाणातील निवडणुकीत भाजपाच्या विजयात आरएसएसचा मोठा वाटा होता. याठिकाणी निवडणुकीत १६ हजाराहून अधिक बैठका स्वयंसेवकांनी घेतल्या होत्या. 10 / 10 नागपूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही महाराष्ट्रात आहे आणि येथेच भाजपाच्या वैचारिक विचारधारेला सर्वोत्तम काम करणे अपेक्षित आहे. हरयाणात जेवढ्या सभा, बैठका झाल्या त्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रात चार पट सभा घेणे अपेक्षित आहे. राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होईल, त्यामुळे १८ नोव्हेंबरपर्यंत प्रचारासाठी मुदत आहे. आणखी वाचा