शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 7:43 PM

1 / 10
राज्याच्या राजकारणात सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यात अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार स्वगृही परतण्याच्या वाटेवर आहेत. अशावेळी पक्षातील निष्ठावंतांचं काय होणार असा प्रश्न उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.
2 / 10
इंदापूरनंतर अनेक ठिकाणी होत असलेल्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीतील निष्ठावंतांना चिंता सतावू लागली आहे. आज शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ज्योती मेटे या आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.
3 / 10
लोकसभेतही ज्योती मेटे बीडमधून उभे राहणार अशी चर्चा होती. मात्र त्यावेळी शरद पवारांच्या भेटीनंतर बीड लोकसभेतून त्यांनी माघार घेतली. आता विधानसभेला बीड मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या ज्योती मेटेंच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाने इथले विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचं टेन्शन वाढणार आहे.
4 / 10
राष्ट्रवादीत अजित पवारांच्या फुटीनंतर अनेक आमदार दादांसोबत गेले. त्यावेळी बीड जिल्ह्यातील एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत राहिले. बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर यांनी पवारांविषयी असलेली निष्ठा आणि त्यांची भूमिका यांचा वारंवार उल्लेख केला. कुणी कुठेही गेली तरी आपण साहेबांची साथ सोडणार नाही असा एल्गारच संदीप क्षीरसागर यांनी केला होता.
5 / 10
मात्र याच संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात ज्योती मेटे यांच्यासह इतर इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची तयारी करत आहेत. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे दिल्लीत खासदार म्हणून गेले. त्यामुळे बीड जिल्ह्यात पवारांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.
6 / 10
धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पक्षाची साथ सोडल्यानंतर बजरंग सोनवणे यांना पक्षात घेऊन पवारांनी लोकसभेचं तिकिट दिले. बीडची जागा पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकली आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीकडील मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती शरद पवार घेत आहेत. त्यात बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे.
7 / 10
ज्योती मेटे यांनी आज पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ज्योती मेटे यांनी बीड विधानसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. त्यादृष्टीने शरद पवारांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे असं सांगितल्यानं बीडमध्ये ज्योती मेटे या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील असं बोललं जाते.
8 / 10
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा निसटता पराभव केला. एक तरूण आमदार मिळाल्याने मतदार संघात विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा लोकांना होती. परंतु त्यांच्यावर सुरुवातीपासूनच विरोधकांनी टक्केवारीचा आरोप केला आहे.
9 / 10
लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालल्याने यावेळी मराठा उमेदवार देण्याचा विचारही पक्ष करत आहे. त्यामुळेच सीए बी.बी.जाधव सह अनेकजण मुलाखती देऊन आले आहेत. विशेष म्हणजे यावेळी खासदार बजरंग सोनवणे हे देखील इच्छुकांच्या मुलाखतीवेळी उपस्थित होते. या मुलाखतीला संदीप क्षीरसागर यांनी गैरहजेरी लावली त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचवल्या होत्या. मागील काही दिवसांपासून सोनवणे आणि आ. क्षीरसागर यांच्यात जमत नसल्याच्याही चर्चा जिल्ह्यात आहेत
10 / 10
२०१९ च्या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनीही त्यांची साथ सोडल्याचे दिसून आले. त्यात तेव्हाचे नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूख पटेल यांच्यासह इतरांचा समावेश होता. माजी आमदार सुनिल धांडे हेदेखील संदीप यांच्यावर नाराज आहेत. पक्षफुटीनंतर संदीप क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मात्र तालुकानिहाय बैठका आणि पदाधिकाऱ्यांशी संदीप क्षीरसागर यांचा समन्वय नसल्याचाही आरोप त्यांच्यावर होतो.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरbeed-acबीडmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार