शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंत्रिमंडळ विस्तार रखडला, एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौराही अचानक रद्द; बोलणी फिस्कटली?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:30 PM

1 / 13
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन १ महिना होत आला तरी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून कोंडी कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी आपला नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द केला त्यामुळे नेमकं विस्तार का रखडला याची चर्चा सुरू झाली.
2 / 13
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी दिल्लीत अनेक दौरे केले आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाची भेट घेतली, परंतु दोन्हीकडून सध्या चर्चेला ब्रेक मिळाला आहे. दिल्लीतील भाजपा नेतृत्वाच्या भेटीसाठी वेळ ठरली तर शिंदे गुरुवारी दिल्लीला जातील.
3 / 13
'केवळ शिंदे यांच्या मागणीचीच नाही तर भाजपाकडूनही मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही अडचणी येत आहेत, याच समस्येमुळे मंत्रिमंडळ विस्तारास विलंब होत आहे,' असं भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याची अटीवर सांगितले. न्यू इंडियन एक्सप्रेसनं ही बातमी दिली.
4 / 13
मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर, शिंदे यांना गृह आणि वित्त ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे ठेवायची आहेत जेणेकरून ते त्यांच्या ४० बंडखोर शिवसेना आमदारांना न्याय देऊ शकतील. शिंदेंनी सर्वांना एकतर कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते.
5 / 13
हे दिलेले वचन पूर्ण करणे त्यांना कठीण जाईल, म्हणून जर वित्त त्यांच्याकडे असेल तर किमान ते आपल्या गटातील आमदार आणि लोकसभा खासदारांना पुरेसा निधी देऊ शकेल आणि गृहमंत्रालयाच्या सहाय्याने ते राज्यावर नियंत्रण ठेवू शकतील आणि शिवसेनेला पुढे धक्का देऊ शकतात.
6 / 13
शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या १२ लोकसभा खासदारांनाही या नव्या युतीतून काही चांगले मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शिंदे यांना सध्या त्यांच्याच आमदार-खासदारांच्या अनेक समस्या आणि मागण्यांनी घेरले आहे.
7 / 13
एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केल्यानंतर आता आणखी मोठी खाती देण्याच्या मनस्थितीत भाजपा नाही. मात्र जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. दोन्ही बाजूच्या रस्सीखेचामुळे मंत्रिमंडळ विस्तारास विलंब होत आहे. भाजपाच्या नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने मंत्रिमंडळ रखडल्याचं बोललं जात आहे.
8 / 13
तर नक्कीच मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे परंतु आमच्यात कुठेही वाद नाहीत. आम्ही येणाऱ्या ३ दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करू असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना केला आहे.
9 / 13
एक किंवा दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. दोन टप्प्यात झाले तर पहिल्या टप्प्यात १९ मंत्री शपथ घेतील त्यात भाजपाचे १२ आणि शिंदे गटाचे ७ असे शपथ घेतील. तर एकाच टप्प्यात घ्यायचं ठरवलं तर २६ भाजपा आणि १४-१५ शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. मात्र मंत्रिमंडळ सदस्य संख्येवर शिंदे-भाजपा यांच्यात एकमत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारास विलंब होतोय.
10 / 13
तर गुजरात पॅटर्नच्या मंत्रिमंडळ विस्तारासारखे नवे चेहरे देऊन दिल्लीतील नेतृत्व राज्यातील नेत्यांना दुसरा धक्का देऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या समर्थकांसाठी कठोर लॉबिंग करत आहेत, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे देखील आपापले लॉबिंग करत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
11 / 13
त्यामुळे शिंदे-भाजपा युतीत मध्यम मार्ग शोधणे कठीण झाले आहे. एकनाथ शिंदेंच्या मागण्या आणि पक्षातंर्गत लॉबिंग हादेखील प्रमुख मुद्दा बनला आहे. त्यातच आता विरोधकांकडून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन होणार असा दावा केला जात आहे.
12 / 13
सुप्रीम कोर्टात १६ आमदारांना अपात्र ठरवले जाईल. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला संजय राऊतांनी लगावला.
13 / 13
१६ अपात्र आमदारांना दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आम्हाला आहे. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही असा मोठा दावाही शिवसेनेने केला आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस