शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा 'MMDL' फॉर्म्युला; १२७ जागांचा सर्व्हे झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 4:34 PM

1 / 10
मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आंदोलन करत आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरमुळे सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला आहे.
2 / 10
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर विधानसभा निवडणुकीत उतरणार, राज्यात मराठा-मुस्लीम-दलित आणि लिंगायत समाजाची मोट बांधणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
3 / 10
सरकारने १३ जुलैपर्यंत वेळ मागून घेतली आहे. आम्ही विधानसभेची तयारी करतोय. मला राजकारणात जायचं नाही पण सरकारच आम्हाला राजकारणात ढकलतंय. माझ्या समाजाला न्याय मिळालं पाहिजे. जर आरक्षण मिळालं तर राजकारणात जायचं नाही. परंतु मराठा समाजाची हक्काची माणसे कसे निवडून आणता येतील याबाबत विचार सुरू आहे अशी माहिती जरांगेंनी दिली.
4 / 10
दलित, मुस्लीम, बारा बलुतेदार, बंजारा, लिंगायत समाज हे राजकीय प्रवाहातून बाहेर आहेत त्यांनासोबत घेऊन मराठा समाज पुढे जाणार आहे. १२७ जागांवर आम्ही चाचपणी केली आहे. मुस्लिमांनी किती दिवस अन्याय सहन करायचा. मराठा समाज मोठ्या मनाने त्यांनाही पुढे आणणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
5 / 10
दऱ्याखोऱ्यात असणारा समाज, मराठवाड्यातील पाण्याच्या विषयात मी हात घालणार नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वीज, पाणी दिले तर कर्जमाफीची गरज भासणार नाही. मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. आम्हाला पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठीही प्रयत्न करणार आहे.
6 / 10
मुस्लिमांना आरक्षण दिले, बारा बलुतेदार यांना त्यांच्या हक्काचं मिळालं, प्रत्येक जातीचा माणूस तिथे सत्तेत बसवला तर त्यातून जातीय तेढ निर्माण होणार नाही. राज्यातील जातीवाद मिटवायचा असेल तर त्या जातीचा माणूस मराठ्यांनी त्याला मोठा करायचा. त्यानेही जातीसाठी काम करायचे यातून जातीय तेढ मिटून जाईल असा दावाही जरांगे पाटलांनी केला आहे.
7 / 10
मी ६ हिंगोली, ७ परभणी, ८ लातूर, ९ धारशिव, १०, नांदेड, ११ बीड, १२ जालना, १३ संभाजीनगर यादिवशी मी दौरा करणार आहे. जिल्ह्यातला मराठा एकत्रित येणार आहे. मराठ्यांच्या लेकरांसाठी आपली शक्ती दाखवली पाहिजे असं आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.
8 / 10
जनजागृती रॅलीच्या माध्यमातून समाजाला एकत्र करणार, मराठ्यांनी विखरून राहायचं नाही. तालुक्यात, रोडवर उभं राहायचे नाही. जिल्ह्यातील मराठ्यांनी एकाच वेळी, एकाच दिवशी ताकदीने यायचे. देशात मराठा समाजाच्या एकजुटीचा संदेश गेला पाहिजे असं जरांगे पाटील यांनी सांगितले.
9 / 10
मराठा समाजाच्या नेत्याला जर पक्षात त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर त्याला पाठबळ देणाराही मराठा समाज असणार आहे. त्यामुळे मराठा एकजूट जनजागृती करायची आहे. राजकारण अजेंडा नाही. गाव बंद करून एकत्र यायचे, मी पूर्ण महाराष्ट्रातल्या २८८ मतदारसंघात चाचपणी करणार आहे.
10 / 10
कोणत्या भागात मराठा समाज जास्त आहे. कुठे इतरांचे जास्त आहे. कोणत्या समाजाचा तिथे उमेदवार दिला पाहिजे. तो उमेदवार उभं करण्यासाठी मी लढतोय. मी ६ टप्प्यात चाचपणी करणार आहे. सध्या २ टप्प्यात चाचपणी केली आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण