शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Political Crisis: ‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:13 AM

1 / 12
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत.
2 / 12
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडल्यानंतर आता संपूर्ण पक्ष संघटनाच ताब्यात घेण्याच्या दृष्टीने निर्णायक पावले टाकायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले होते.
3 / 12
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती. तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्हही आपल्याला मिळावे, असे त्यांनी म्हटले होते. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि नगरसेवक मोठ्याप्रमाणावर फुटले असले तरी शिवसेना ही संघटना ताब्यात घेणे, तितकेसे सोपे नाही.
4 / 12
आता एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनंतर शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेतील सदस्य कसे फोडता येतील, यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार केवळ आमदार, खासदार फुटले म्हणजे पक्षात फूट पडली असे होत नाही. त्यासाठी संघटनेतही फूट असणे आवश्यक असते.
5 / 12
शिवसेना संघटनेत सर्वात महत्वाच्या मानल्या गेलेल्या प्रतिनिधी सभेत २८२ सदस्यसंख्या आहे. एकनाथ शिंदे आता त्यापैकी दोन तृतीयांश म्हणजे १८८ सदस्य फोडण्याच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांना यामध्ये यश आल्यास शिवसेना आणि उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने अडचणीत येतील.
6 / 12
एकनाथ शिंदे यांनी प्रतिनिधी सभेतील १८८ सदस्य आपल्या बाजूला वळवल्यास संपूर्ण पक्षात उभी फूट पडल्याच्या दाव्याला बळकटी मिळेल. हा धोका शिवसेनेच्या लक्षात आला आहे. त्यामुळेच सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून संघटना बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
7 / 12
शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे.
8 / 12
प्रतिनिधी सभेत एकूण २८२ सदस्य आहेत. शिवसेनेच्या २८२ जणांच्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश सदस्यांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा मिळाला तर शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून पडद्यामागे प्रचंड प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.
9 / 12
तसे घडल्यास संपूर्ण शिवसेना पक्षच ठाकरे कुटुंबीयांच्या निसटण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण १४ सदस्यांपैकी ९ सदस्यांना निवडून देण्याचे अधिकार आहेत. उर्वरित पाच जागांवरील सदस्यांची निवड पक्षप्रमुख करतात. दर पाच वर्षांनी हे सदस्य निवडले जातात.
10 / 12
सन २०१८ साली हे सदस्य निवडण्यात आले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य हे पक्षनेते असतात. सध्याच्या घडीला राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे.
11 / 12
नुकत्याच झालेल्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ व रामदास कदम यांची हकालपट्टी केली होती. तर सुधीर जोशी यांच्या निधनामुळे एक जागा अगोदरच रिक्त झाली होती. आता शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य उरले आहेत.
12 / 12
शिवसेनेच्या घटनेनुसार संघटनेत कोणतेही बदल करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांमध्ये कोणत्याही मुद्द्यावर मतभेद असतील तर शिवसेना पक्षप्रमुखांचा कौल हा निर्णायक आणि अंतिम असतो.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना