इतरांप्रमाणे मुंबईकरही सध्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईच्या आकाशात काळया ढगांची दाटी होत आहे. मात्र अजूनही गारव्याची अनुभूती देणा-या जलधारा बरसलेल्या नाहीत. पाऊस पडून गेल्यानंतर येणारा जमिनीचा सुगंध, हिरवीगार वनराई मनाला प्रसन्न करते. मुंबई सिमेंट-कॉंक्रीटचे जंगल बनली असली तरी, आजही मुंबईत अशा काही जागा आहेत जिथे तुम्हाला पावसामध्ये मनाला प्रसन्न करणारा अनुभव मिळतो. असेच काही स्पॉटस तुमच्यासाठी. मरीन ड्राइव्ह क्वीन नेकलेस म्हणजे मरीन ड्राइव्ह. तीन किलोमीटरमध्ये पसरलेली मरीन ड्राइव्हची चौपाटी दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. मरीन ड्राइव्हवर नेहमीच गर्दी असते. पण पावसाळयात मरीन ड्राइव्हची चौपाटी विशेष भावते. किना-यावर आदळणा-या लाटांचे तृषार अंगावर झेलण्यासाठी मुंबईकर पावसाळयात इथे मोठी गर्दी करतात. गेट वे ऑफ इंडिया ताजमहाल हॉटेलजवळील गेट वे ऑफ इंडियावरही पावसाळयात मुंबईकर गर्दी करतात. भरतीच्यावेळी किना-यावर आदळणा-या मोठया लाटांचे तृषार अंगावर घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. हाजी अली महालक्ष्मी मंदिराजवळ असलेला हाजी अली दर्गा समुद्रामध्ये बांधण्यात आला आहे. या दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी समुद्रातून मार्ग तयार करण्यात आला आहे. पावसाळयात इथे येणा-या भक्तांना लाटांचे तृषार अंगावर झेलत दर्ग्यामध्ये यावे लागते. जोरदार पाऊस झाल्यानंतर हाजी अली दर्ग्याचा रस्ता पाण्याखाली जातो. वरळी सीफेस पावसाळयात वरळी सीफेसवरही नेहमीच गर्दी असते. इथेही लाटांचे पाणी अंगावर घेण्यासाठी मुंबईकर मोठया संख्येने गर्दी करतात. वांद्रे-वरळी सी लिंकमुळे या चौपाटीचे सौदर्य अधिक वाढले आहे. वरळी सीफेसही दक्षिण मुंबईतच आहे. जुहू बीच पावसाळयात शहरातील मुंबईकरांना वरळी, मरीन ड्राइव्ह या दोन चौपाटया जवळ पडतात तसेच उपनगरात रहाणा-या मुंबईकरांसाठी जुहू चौपाटी जवळ आहे. बांद्रा बँडस्टॅण्ड अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी बँडस्टॅण्डला रहातात. उपनगरातील बँडस्टॅण्डचा समुद्रही तितकाच सुंदर आहे. राणीची बाग राणीची बाग म्हणजे भायखळयातील प्राणी संग्रहालय. इथे प्राण्यांची संख्या कमी असली तरी, इथली हिरवीगार वनराई तुम्हाला प्रेमात पाडते. इथे अनेक वनऔषधींचीही लागवड करण्यात आली आहे. नॅशनल पार्क मुंबईच्या उत्तरेला बोरीवलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क आणखी एक पावसाळयातील सुंदर ठिकाण. १०४ कि.मी.मध्ये पसरलेल्या या पार्कमध्ये प्राण्यांबरोबर तुम्हाला निसर्गाचाही मनसोक्त आनंद लुटता येतो. पावसळयात इथे छोटे-छोटे धबधबे तयार होतात. अनेक ग्रुप आणि कुटुंब इथे वीकएण्डला शनिवारी-रविवार सहलीसाठी येतात.