- ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 5 - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ पहाटे ६:१५ वाजण्याच्या सुमारास एक अवजड वाहन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. सर्वत्र विघ्नहर्ता गणरायाचे आगमन होत असताना मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहन बंद पडल्याने विघ्न आले आहे. हा कंटेनर मुंबईकडे जात असताना अमृतांजन पुलामधून बाहेर पडताच उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने मार्गातच बंद पडले. वाहन अवजड व लांब आल्याने त्यामुळे मुंबईकडे जाणार्या तिनही लेन व्यापल्या असून पुर्ण मार्गच वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. जवळच बोरघाट पोलीस चौकी तसेच मदत यंत्रणा असल्याने तातडीने हे वाहन बाजुला करण्याचे काम सुरु केले असले तरी ते अवजड असल्याने बाजुला करण्यास वेळ जात असल्याचे बोरघाटचे सहाय्यक निरीक्षक तुकाराम जोशी यांनी सांगितले. दोन तासापासून या मार्गावरची वाहने न हालल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मुंबईकडे जाणारी वाहतुक वलवण गावाजवळून लोणावळा शहरातून जाणार्या राष्ट्रीय मार्गावर वळविण्यात आली आहे. दरम्यान सदर अवजड वाहन बाजुला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असून किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येत नसल्याचे महामार्ग पोलीसांनी सांगितले.