देवेंद्र पाठक / ऑनलाइन लोकमतरामनगरची विकासाकडे वाटचाल : विद्यापिठाने दिली चक्की, सौरदिवे आणि संगणक धुळे, दि. 17 - रामनगर हा धुळे तालुक्यातील छोटा पाडा. शहरापासून जवळ असूनही सोयी - सुविधांपासून कोसो दूर. स्वातंत्र मिळूनही पारतंत्र्यात असल्याची लोकांची भावना. सामाजिक बांधिलकी जपत जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने एक पुढचे उचलले आणि इथल्या लोकांनी विकासाचा सूर्य पाहिला... त्यांच्या चेहऱ्यावर तोच आनंद अनुभवास येत आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘स्मार्ट व्हीलेज’ अतंर्गत खान्देशातील पाच गावे दत्तक घेतली. यात धुळे तालुक्यातील नगाव गु्रप ग्रामपंचायतीत असलेल्या रामनगर या गावाचाही समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. सुधीर मेश्राम यांनी प्रयत्न सुरु केले. स्मार्ट व्हीलेज ही त्यांचीच एक संकल्पना. रामनगर गावात केवळ ५० घरे आहेत. भिल्ल समाजाची इथे वस्ती. लहान मोठे धरुन आजच्या स्थितीत गावाची लोकसंख्या १२० एवढी. गावात कुठल्याही सुविधा नव्हत्या़ एवढेच काय तर दळण दळण्यासाठी चक्की सुध्दा नव्हती. नागरिक किंवा महिलांना गावापासून ५ ते ६ किमी अंतरावर असलेल्या तिसगाव ढंढाणे अथवा वडेल या ठिकाणी दळणासाठी पायपीट करावी लागत होती. तिथून पुन्हा पायी गावाकडे येत असताना दमछाक व्हायची ती वेगळी. पावसाळ्यात तर खूपच हाल व्हायचे. नेमकी ही समस्या जाणून विद्यापीठाने इथे दळणासाठी चक्की देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. गावातीलच सुरेश रुपला ठाकरे यांच्यावर चक्कीची जबाबदारी सोपविण्यात आली. ते नियमित डिझेल आणतात आणि चक्की चालवितात़ या चक्कीमुळे आमचा वनवास संपला असल्याची नागरिकांची भावना आहे. सुरेश यांना यानिमित्ताने रोजगार मिळाला आणि गावातील नागरिकांना दिलासा. सौरदिव्यामुळे अंधार दूरगावात वीज पुरवठा हा प्रकारच नव्हता. त्यामुळे सायंकाळ झाली की अंधारच अंधार. गाव अगदी जंगलात आहे की काय, अशी परिस्थिती व्हायची. नगाव ग्रुप ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करुनही उपयोग होत नव्हता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने याकडे लक्ष दिले. विद्यापीठाच्या माध्यमातून गावात दोन सौरदिवे बसविण्यात आले. सौर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात गावातील लोकांचे चेहरेही उजळून निघाले. मुलांना मिळाले संगणक गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे़ पहिली ते चौथीचे मिळून विद्यार्थी पटसंख्या केवळ दहा. वर्गखोली एकच असली तरी त्यांना शिक्षण मात्र नियमित देण्याचा प्रयत्न सुरु आहे़ काळ झपाट्याने बदलत असताना याठिकाणी असलेल्या मुलांना देखिल शिक्षणाच्या नव्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरु केला. मग शाळेला संगणक देण्याचे ठरले. पण गावात विजपुरवठा नाही मग संगणक चालणार कसे. यावरही विद्यापीठाने सौरउर्जेचा पर्याय शोधला. शाळेच्या छतावर सौरउर्जेचो पॅनल बसविण्यात आले. त्यावर दिवे आणि तीन संगणक सुरु असतात. मुलांना संगणकाची ओळख करुन दिली जात आहे़ मुलेही हसत-खेळत संगणक हाताळणी करत आहेत़ संगणकावर चित्रे काढत आहेत़ आता तर लवकरच वर्गात ई-लर्निंग सुरु करण्याचा मानस प्राथमिक शिक्षक अशोक सोनवणे यांनी बोलून दाखविला.