ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. यासाठी चांदा ते बांदा संघर्षयात्रा काढली जात आहे. दरम्यान, शेतक-यांच्या भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी ए.सी. मर्सिडीज बेन्झ बसमधून नागपूरहून चंद्रपुरात दाखल झाले. शेतक-यांसाठी काढलेल्या यात्रेला एवढा तामझाम कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करुन विरोधकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, भाजपाला एकटं पाडण्यासाठी काँग्रेसला शिवसेनेचा मॉरल सपोर्ट हवा आहे. संघर्षयात्रेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांना या यात्रेत सहभागी व्हावे, असे जाहीर निमंत्रण देत शिवसेनेचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे सूचित केले. यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. दरम्यान, या नेत्यांनी संपादकांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान शिवसेनेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न असल्याचे दिसून आले. यावेळी अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली. शिवसेनेचे आमदारही या मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर आले. हे करून शिवसेनेने अप्रत्यक्षपणे आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला.राहुल, अखिलेश, पवारांनी सहभागी व्हावेया संघर्ष यात्रेत अ.भा. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती या नेत्यांना करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.