ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28- शहर, उपनगरांसह राज्यभरात गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. अनेक सार्वजनिक मंडळांनी गणपतीच्या मूर्ती कार्यशाळेतून मंडळाकडे नेण्यासही सुरुवात केली आहे. गेल्या रविवारी बहुतेक मंडळांनी गणेशाच्या मूर्ती मंडळात नेल्या आहेत. तर आज गणपती आगमनाचा शेवटचा आठवडा असल्यानं उर्वरित गणेश मंडळांची गणपतीच्या मूर्ती नेण्याची लगबग सुरू आहे.मात्र या गणेश मंडळांना मूर्ती मंडळाकडे नेताना रस्त्यावर उखडलेल्या पेव्हर ब्लॉकचा सामना करावा लागतो आहे. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर या खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे लालबाग परिसरातही वाहतूक काहीशी मंदावली आहे. पुलासह रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात पेव्हर ब्लॉक टाकून बुजवले असले तरी बुजवलेले हे खड्डे पुन्हा डोके वर काढताना पाहायला मिळत आहे. परिणामी अनेक गणेश मंडळांना कार्यशाळेतून मूर्ती मंडळात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर परिसरातल्या वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दुरुस्त केलेला चिंचपोकळी ते लालबागमधल्या संपूर्ण रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चिंचपोकळीच्या पुलावरही वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे.लालबागला जाणारे तसेच आंबेडकर मार्गाने परळच्या दिशेला जाणारे वाहनचालक एन. एम .जोशी मार्गावरून ये-जा करतात. परंतु चिंचपोकळी पुलावरील पेव्हर ब्लॉक उखडल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.या उखडलेल्या रस्त्यांमुळे लालबाग सिग्नल ते भारतमातापर्यंत वाहतूक कोंडी होते आहे.