शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गणपतीक कोकणात जातास? करुळ, फोंडा की आंबोली; कोणता घाट रस्ता चांगला, एकदा बघाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 11:21 AM

1 / 9
गणेशोत्सवासाठी आजपासून कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरु होणार आहे. साधारण दुपारनंतर मुंबई-पुण्यातून मंडळी गावची वाट धरणार आहेत. कोकणात जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गेल्या दशकभरापासून कामच सुरु असलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि दुसरा म्हणजे पुणे-कोल्हापूरमार्गे. टोलमाफी असल्याने अनेकजण कोकणात जाण्यासाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्ग पकडतात. एवढे ठीक आहे, पण कोल्हापूरच्या पुढे काय? रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते... गणपतीकच म्हायत...
2 / 9
गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय, पण रस्त्यांची नीट माहिती घेतली का? सिंधुदुर्गात जाणाऱ्यांसाठी आम्ही तिन्ही महत्वाच्या घाटांच्या रस्त्यांच्या अवस्थेची माहिती घेऊन आलो आहोत. जे दररोज या रस्त्याने प्रवास करतात, त्यांच्याकडूनच ही माहिती घेतलेली आहे. खड्यात आदळून गाडी जागच्या जागीच थांबली, काल परवाच गेलेल्याची बोलकी प्रतिक्रिया ऐकून तेथील खड्डेमय रस्त्यांची कल्पना येईल.
3 / 9
कोकणात जाणाऱ्या मुंबई गोवा हायवेची दुरवस्था तर सर्वांनाची माहिती आहे. काल परवा पासून मंत्र्यांनी दौरा काढला आहे, यानंतर मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरु होणार आहे. हे मुरूम किती दिवस टिकणार हे कोकणी माणसाला सांगायला नकोच. पण घाटावरून गेल्यावर काय? मुंबई ते पुणे एक्स्प्रेस वे एकदम चकाचक, त्यापेक्षा थोडा कमी चकाचक असा पुणे बंगळुरू हायवे, कोल्हापूर-निपाणीपर्यंत. पण त्यानंतरचा रस्ता तुमचे कंडबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
4 / 9
कोल्हापूरातून कोकणात जाण्यासाठी तसे तीन-चार घाट महत्वाचे. सिंधुदुर्गात जाण्यासाठी करुळ-बावडा घाट, फोंडा घाट आणि तिसरा म्हणजे आंबोली घाट. यापैकी सध्या सुखरूप जाण्यासाठी एकच घाट लायकीचा आहे. म्हणजे सुस्थितीत आहे. बाकी दोन्ही घाटांमध्ये रस्ताच दिसत नाही अशी अवस्था आहे.
5 / 9
करुळ घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. म्हणजे तिथून कार, टेम्पो ट्रॅव्हलर जाऊ शकतात. पण त्याआधीचा घाटमाथ्यावरील ५०-५५ किमीचा रस्ता मात्र प्रचंड खड्डेमय आहे. हे खड्डे बुजविणे काही प्रशासनाला जमणार नाही. दुसरा बावडा घाट देखील त्याच रस्त्याला पुढे जोडलेला असल्याने खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. हा एक मात्र चांगले आहे, एकदा का घाट उतरलात की मग पुढे चांगले रस्ते आहेत.
6 / 9
गेल्या काही वर्षांपासून फोंडा घाटाच्या कोल्हापूरकडील रस्त्याचे काम सुरु आहे. त्यातच या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की ते भोगावती-राधानगरी-दाजीपूर ते फोंड्यापर्यंत संपतच नाहीत. रस्ताच दिसत नाही म्हणे. चिखलच चिखल आणि मोठ्या खड्ड्यात गाडीचे चाक आदळले की गाडी थांबलीच म्हणून समजा. अवजड वाहने देखील याच घाटातून जात आहेत. यामुळे रस्ता तर उखडला आहेच पण तुम्हाला ओव्हरटेक मारणे देखील वळणावळणांमुळे अशक्य आहे. यामुळे अवजड वाहनांच्या वेगानेच तुम्हाला ८०-९० किमीचे अंतर पार करावे लागणार आहे.
7 / 9
त्यातले त्यात आंबोली घाट रस्ता चांगला आहे. आजरा आणि आंबोलीच्या मध्येच असलेला एका गावातील रस्ता सोडता बाकी रस्ता तसा चांगला आहे. अधे मध्येच खड्डे आहेत. यामुळे वरच्या दोन्ही घाटांपेक्षा तुम्हाला आंबोली घाट आरामदायी ठरू शकेल. या घाट रस्त्याचे दुखणे एवढेच की कोल्हापूरच्या पुढे जाऊन निपाणी मार्गे तुम्हाला जावे लागते. यामुळे थोडा वळसा पडतो. ही एक गोष्ट वगळली तर तुम्हाला या घाटातून त्रास होणार नाही.
8 / 9
रत्नागिरी व कोल्हापूर या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांना जोडणारा सर्वात सुरक्षित घाट म्हणून आंबा घाटाची ओळख आहे. अनेक ठिकाणी एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. दोन वर्षांपूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणी अद्यापही दुरुस्ती सुरू आहे. तिथे लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. रत्नागिरीच्या हद्दीतील पाच ते सात किलोमीटरचा रस्ता सोडता घाटातील सर्व रस्ता पूर्णतः उखडला आहे.
9 / 9
पावसाचे दिवस आहेत. घाटात सायंकाळी पाच साडेपाच नंतर धुके दाटायला सुरुवात होते. यामुळे हे तिन्ही घाट या वेळेपर्यंतच क्रॉस होत असतील अशा वेळेने निघा. नाहीतर धुक्यात खड्डे दिसणार नाहीत ते झालेच पण वळणावळणाचा रस्ताही दिसणार नाही. यामुळे गणेशोत्सवाला जाताना नसते विघ्न, टाळाल ना...
टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबई