शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सगळेच फेक! पूजा खेडकरांनी घरचा पत्ता दिला, तो निघाला बंद पडलेल्या कंपनीचा; रेशन कार्डही बनविले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 10:42 AM

1 / 8
पूजा खेडकर या आयएएस ट्रेनी अधिकाऱ्याने नोकरी मिळविण्यासाठी सर्व हद्द पार केली आहे. खोटी प्रमाणपत्रे, खोटे उत्पन्न दाखवून नोकरी मिळविल्याचे समोर आलेले असताना आता त्यांनी हे सर्व खोटी कागदपत्रे मिळविण्यासाठी खोटा पत्ता आणि रेशनकार्डही बनविल्याचे समोर आले आहे. यामुळे बडा वरदहस्त असला आणि सरकारी यंत्रणा हाताशी असली की कशी बनावटगिरी करता येते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
2 / 8
पुण्यात गेल्या दोन महिन्यांतील हे दुसरे हाय प्रोफाईल प्रकरण आहे. बिल्डर बाळाच्या प्रकरणात समस्त पुणेकरांनी आवाज उठविला म्हणून बाळाच्या आजोबा, आई, बाप, पोलीस, आमदार ते ससूनचे डॉक्टरांपर्यंत सर्वांचे पितळ उघडे पडले होते. आता एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने आयएएस मॅडमच्या चमकोगिरीचे ट्विट केले आणि अख्खे कुटुंब काय काय प्रकार करत होते, ते समोर येऊ लागले आहे.
3 / 8
पूजा खेडकर यांनी एकापेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्रे मिळविली आहेत. अंशत: दृष्टीहीन असल्याचे, गुढघ्याला ७ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र मिळविले आहे. त्याशिवाय लाखोंमध्ये उत्पन्न असतानाही क्रिमिलेअर प्रमाणपत्र घेऊन बळकावलेली युपीएससीची जागा ही देखील एक मोठी फसवणूकच असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत.
4 / 8
हे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पूजा यांनी खोटा पत्ता दिल्याचेही समोर येत आहे. तसेच या पत्त्यावर त्यांनी रेशन कार्डही काढल्याचे समोर येत आहे. आता या गोष्टी काही त्यांनी अर्ज केला आणि मिळाल्या अशा होत नाहीत. यासाठी कोणी मदत केली, कोणाचा वरदहस्त होता आदी गोष्टी देखील समोर येण्याची मागणी होत आहे.
5 / 8
पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता देऊन आणि त्यासाठी बनावट रेशनकार्ड देऊन अपंगत्व प्रमाणपत्र मिळविल्याचे समोर आले आहे. बाणेरला राहत असूनही पूजा यांनी प्लॉट नंबर 52, देहू-आळंदी, तळवडे हा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील पत्ता रुग्णालयाला दिला होता.
6 / 8
मुळात हा पत्ता थर्मोव्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या सहकाऱ्याचा होता. याच कंपनीच्या नावावर पूजा वापरत असलेली ऑडी कार आहे. या कंपनीने महापालिकेचा जवळपास पावणेतीन लाखांचा कर थकविलेला आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही ९ ने दिले आहे.
7 / 8
पूजा खेडकर यांच्या आईवर पिस्तुल प्रकरणात एफआयआर दाखल झाला आहे. आता माजी सरकारी अधिकारी असलेल्या तिच्या वडिलांवरही कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. एसीबीकडून खेडकर कुटुंबाची चौकशी करण्यात येणार आहे. दिलीप खेडकर यांनी जमविलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. यात आता आयकर विभागानेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
8 / 8
एकंदरीतच खेडकर कुटुंबाची मुजोरी त्यांच्याच अंगाशी आली असून सर्वबाजुंनी कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे. पूजा खेडकर यांना प्रशिक्षण थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून आठवड्याभरात आयएएस प्रशिक्षण केंद्र असलेल्या मसुरी येथे हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या सर्व घोटाळ्यांनंतर पूजा खेडकर यांची नोकरी शाबूत राहणे मुश्कील असल्याचे बोलले जात आहे.
टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरfraudधोकेबाजीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगPuneपुणे