ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १३ - स्वच्छतेवरती दिलेल्या भाषणापेक्षा चित्रकाराचं काम स्वच्छतेचा जास्त प्रसार करतं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामाजिक जीवनातलं कलेच कार्य अधोरेखीत केलं. अनेक रेल्वेस्थानकांवर चित्रकार सौंदर्यीकरणाचं काम करत आहेत. याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, हे सरकार करत नाहीये, सरकारकडे यासाठी बजेटही नाहीये, परंतु कलाकार स्वत:हून पुढे येतात आणि रेल्वेस्थानके चित्र काढून सुंदर करतात. एखाद्या भाषणापेक्षा चित्रकारांचं हे काम स्वच्छतेचा जास्त चांगला प्रचार करतं असं मोदी पुढे म्हणाले.मुंबईमध्ये बाँबे आर्ट गॅलरीच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राज्यपाल विद्यासादर राव, चित्रकार वासुदेव आदी मान्यवर उपस्थित होते. कलेचं जीवनातलं स्थान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगताना माणसाला रोबो होण्यापासून वाचायचं असेल तर कलेला जवळ करायला हवं असं ते म्हणाले. माणसातली माणुसकी जपण्याचं काम कला करते, त्यामुळे प्रत्येक शाळेनं मुलांच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आर्ट गॅलरीला भेट देणं हा कार्यक्रम आवर्जून ठेवावा असा सल्ला मोदींनी दिला. कलेला राजाश्रय नसावा तर कलेला राज्याने पुरस्कृत करावे असं मत व्यक्त करताना, कला ही मुक्त असावी, स्वतंत्र असावी असंही मोदी म्हणाले. मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे:- कलेला काळाचं, वंशाचं, धर्माचं, प्रांताचं तसंच वयाचं बंधन नसतं.- कला ही मुक्त असायला हवी, स्वतंत्र असायला हवी.- कला ही फक्त भिंतीवर लावण्यापूरती मर्यादीत नसते तर ती समाजाची शक्ती असते.- मुंबईमध्ये आर्ट सोसायटीने तीन शतकं समाजावर प्रभाव पाडलाय कारण ती कलेची ताकद आहे.- मुंबईची ओळख आर्थिक राजधानी अशी आहे, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या व रंगभूमी व कलेच्या प्रांतातही ती राजधानी आहे.