राजतडक, खडकी, औरंगाबाद ते आता संभाजीनगर; ‘असा’ आहे या शहराच्या नावाचा इतिहास By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 7:41 PM
1 / 9 गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरकारने अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजूर दिली. 2 / 9 एकीकडे शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचे सांगितले जात आहे. भाजपने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र देऊन बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. 3 / 9 राज्यातील पराकोटीला पोहोचलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारचे काय होणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, यादरम्यान घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 4 / 9 मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या शहराचा इतिहासही मोठा आहे. बिवी का मकबरा, पानचक्की, ऐतिहासिक दरवाजे, नहर ए अंबरी अशा एक ना अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. 5 / 9 औरंगाबाद पुरातन आणि इतिहासाचं वरदान असलेल हे शहर आहे. या शहराच्या अंगाखांद्यावर इतिहासनं आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. मुंबईच्या कान्हेरी गुफांमध्ये एक शिलालेख सापडला होता त्यात औरंगाबादचं नाव 'राजतडक' असल्याचं आढळून आले आहे. हे नाव कुणी ठेवले त्या नावाचा वास्तिविकतेशी काय संबंध यावर अजूनही प्रकाश पडलेला नाही. 6 / 9 या शहराचे नावाजलेले नाव हे खडकी आहे. हा परिसर बेसॉल्ट खडकावर वसलेला आहे. त्यात शहरात अगदी प्राचीन असे खडकेश्वर महादेवाचे मंदिर आहे. याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे अशी इतिहासात नोंद आहे. 7 / 9 त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता खऱ्या अर्थाने 'नहरे ए अंबरी' सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्याने या गावाचे शहर केले. मात्र त्याने या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही. कालांतराने 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्याने आपल्या नावावरून या शहराचे नाव 'फतेहनगर' असे ठेवले. 8 / 9 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्याने पुन्हा या शहराचे नाव फतेहनगरवरून 'खुजिस्ता बुनियाद' असे ठेवले. कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळाले. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले. 9 / 9 काळाच्या ओघात औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी झाली. अजिंठा आणि वेरुळ सारख्या वास्तूंमुळे अगदी जगाच्या कानाकोप-यात औरंगाबादचं नाव दुमदुमले. छत्रपती संभाजी महारांच्या याच इतिहासाच्या प्रेमापोटी आता या शहरचे नाव संभाजीनगर भर देण्यात आल्याचे सांगितले जाते. अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आणखी वाचा