राज ठाकरेंनी बोलावलं अन् तालुकाप्रमुख बनवलं; बच्चू कडूंची राजकीय एन्ट्री कशी झाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:58 IST
1 / 10मनसे प्रमुख राज ठाकरे आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची महाराष्ट्राला ओळख करून देण्याची गरज नाही. शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत तर एकेकाळी शिवसेनेत काम करणारे बच्चू कडू हे आता प्रहार संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात काम करतात. 2 / 10राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या राजकीय संबंधांबाबत आजवर फार काही जुळलं नाही. परंतु बच्चू कडू यांच्या राजकारणाची सुरुवात राज ठाकरेंमुळे झाल्याचं समोर आले आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या आयुष्यातील कधीही न ऐकलेल्या गोष्टी एका मुलाखतीत सांगितल्या. त्यावेळी कडू यांनी राज ठाकरेंचा अमरावती दौरा आणि त्यांची शिवसेनेतील कारकिर्द यावर भाष्य केले. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते.3 / 10या मुलाखतीत बच्चू कडू म्हणाले की, आधीपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होतो, शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची सेना असा आमचा समज होता. आम्ही तिथे काम करायला लागलो, तेव्हा संघटन बनले. त्यावेळी खूप मुले माझ्यामागे राहायची. शिवसेनेचे काहीही असले तरी मला फोन करून सांगायचे.4 / 10एकदा कॉलेजमधून आलो, तेव्हा एकाठिकाणी बैठक होती. त्यावेळी भारत गणेशपुरे हा भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख होता. जो आता अभिनेता आहे. माझा मित्र आणि मी बैठकीला गेलो. तिथे शिवसेनेच्या २ गटात वाद सुरू होता. कोणाला तालुकाप्रमुख करायचे यावरून दोन्ही गट एकमेकांशी भांडत होते अशी आठवण त्यांनी सांगितले.5 / 10त्या बैठकीत भारत गणेशपुरे आणि बाळासाहेब देशमुख यांनी बच्चू कडूला तालुकाप्रमुख करा, हा चांगला पोरगा आहे असं वैगेरे बोलले. मला काही व्हायचे नव्हते, मी नाही नाही म्हटलं तरी त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी सगळीकडे बच्चू कडू भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख बनले अशी बातमी आली. 6 / 10त्यानंतर कॉलेजला गेलो तेव्हा प्राचार्यांनी मला बोलावून घेतले. तू तर विद्यार्थ्यांचा प्रमुख झाला असं बोलले. तेव्हा मला करंट लागला, यात काही तरी दम आहे असं वाटले. मग त्यात काम करायचे हे ठरवले. राजकारणाचा पहिला किडा तिथे चावला. काही ध्यानीमनी नसताना, शिफारस नसताना अपघाताने मी राजकारणात आलो. 7 / 10मला त्या प्राचार्याने बोलवल्यानंतर या पदात काही तरी वजन आहे वाटले. त्याकाळी प्राचार्याने कॉलेजच्या एका विद्यार्थ्याला बोलावून घेणे ही मोठी गोष्ट होती. मी बी कॉमला होतो. मी त्या पदावर असताना इतकं काम केले, सगळे शिवसैनिक माझ्यासोबत असायचे. मग शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाने मला पक्षातून काढून टाकले असंही कडू यांनी सांगितले.8 / 10त्यानंतर ग्रामीण विद्यार्थी सेना मी बनवली. त्यानंतर पुन्हा काही काळाने मला शिवसेनेत घेतले. मी तिथे जिल्हा परिषद लढलो. तिथे ८- ९ मते मिळाली होती. आमच्याकडे खूप फौजफाटा होता. राज ठाकरे आमच्याकडे दौऱ्यावर आले होते. आमच्याकडे खूप गँग होती, तेव्हा बच्चू कडू कोण आहे असं सांगत त्यांनी बोलावून घेतले.9 / 10राज ठाकरे हॉटेलवर थांबले होते, तेव्हा मधुसन कुलथे तालुकाप्रमुख होते. ते सांगायचे, याने सगळे शिवसैनिक घेतले, माझ्यासोबत एकही शिवसैनिक ठेवला नाही. त्यावर राज ठाकरेंनी याला काढून टाका आणि बच्चू कडूला तालुकाप्रमुख करा असं सांगितले. राज ठाकरेंसोबत ती माझी पहिलीच भेट होती असंही बच्चू कडू यांनी म्हटलं.10 / 10मी तालुका प्रमुख झालो त्यानंतर राज ठाकरेंनी एक मोठं आंदोलन हाती घेतले होते. नागपूर विद्यापीठावर आंदोलन होते. त्या आंदोलनाला विदर्भातून सगळ्यात जास्त मुले आम्ही नेले होते. हे आजपर्यंत बोललो नाही. पहिल्यांदाच हे सांगतोय असंही बच्चू कडू यांनी मुलाखतीत सांगितले.