शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नाराज आणि बंडखोरांचे युती आणि आघाडीच्या दिग्गजांसमोर आव्हान!

By बाळकृष्ण परब | Published: April 17, 2019 6:15 PM

1 / 13
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील जळपास सर्वच मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार निश्चित झाले आहे. प्रचारही आता टीपेला पोहोचलेला आहे. मात्र ऐन निवडणुकीमध्ये युती आणि आघाडीच्या अनेक दिग्गज उमेदवारांसमोर स्वपक्षातील नाराज आणि बंडखोरांचे आव्हान उभे राहिले आहे. नाराज आणि बंडखोरांमुळे निवडणुकीतील जय पराजयाचे गणित बिघडू शकणाऱ्या मतदारसंघांचा घेतलेला हा आढावा.
2 / 13
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आमने-सामने असल्याने रायगड लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्यावेळी मोदी लाट असतानाही अनंत गीते यांचा केवळ दीड हजार मतांनी विजय झाला होता. मात्र यावेळी सुनील तटकरे यांनी गीतेंसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच शिवसेनेतील अनेक नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी गीते यांना भोवण्याची शक्यता आहे.
3 / 13
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनाही यंदाची लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे यांच्या विरुद्ध भाजपाचे माजी नेते अनिल गोटे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गोटेंच्या उमेदवारीमुळे सुभाष भामरे यांचे मतांचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.
4 / 13
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपावासी झालेल्या संजयकाका पाटील यांनी 2014 मध्ये सांगलीच्या काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजयकाकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. तर दीर्घकाळ भाजपासोबत राहिलेल्या गोपिचंद पडाळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवल्याने संजयकाका पाटील यांचे मतांचे समीकरण बिघडले आहे.
5 / 13
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील कांग्रेसचा प्रभाव कमालीचा ओसरला आहे. त्यातच नेत्यांमधील गटबाजीमुळे पक्ष अधिकच दुबळा झाला आहे. विशेषत: संजय निरुपम गट आणि मिलिंद देवरा गट मुंबई काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. या गटबाजीमुळे काँग्रेसला फटका बसू शकतो.
6 / 13
भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक शिवसैनिकांकडून करण्यात येत होती. मात्र भाजपाने कपिल पाटील यांना पुन्हा संधी दिली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्याचा फटका कपिल पाटील यांना बसू शकतो.
7 / 13
बीडमध्ये भाजपाच्या प्रितम मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे असा सामना रंगणार आहे. मात्र राज्यपातळीवर महायुतीसोबत असलेल्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मुंडे भगिनींना समर्थन न देण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी बजरंग सोनावणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे प्रितम मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
8 / 13
गेल्यावेळी मोदी लाटेमध्येही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रावादीचा कोल्हापूरचा गड अभेद्य राखला होता. मात्र यावेळी येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. धनंजय महाडिक यांच्यासमोर पुन्हा एकदा मंडलिक यांचे आव्हान आहे. मात्र कांग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाडिक यांच्याबाबत संभ्रम निर्माण करणारी भूमिका घेतलेली असल्याने महाडिक यांच्या अडचणी वाढण्यची शक्यता आहे.
9 / 13
औरंगाबाद लोकसभा मतदारसंचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व केलेल्या चंद्रकांत खैरे यांच्यासमोर यावेळी कडवे आव्हान आहे. येथे खैरेंसमोर काँग्रेसचे सुभाष झांबड, एमआयएमचे इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचे आव्हान आहे. त्यातही खैरेचे कट्टर विरोधक असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला सोडचिठ्ठी देणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून छड्डू ठोकले असून, त्यांना कांग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांची साथ मिळाल्याने औरंगाबादची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
10 / 13
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर विरुद्ध संजय निरुपम अशी लढत होत आहे. मात्र येथेही पक्षांतर्गत गटबाजी हे काँग्रेससमोरील आव्हान आहे. तसेच निरुपम यांच्यावर नाराज असलेला काँग्रेसमधील गट त्यांचे गणित बिघडवण्याची शक्यता आहे.
11 / 13
गेल्या काही काळापासून भाजपाचा बालेकिल्ला बनलेल्या खान्देशातील जळगाव मतदारसंघात यावेळी भाजपासाठी सारे काही आलबेल नसल्याचेच संकेत मिळत आहेत. त्यातच एका कार्यक्रमात भर व्यासपीठावर भाजपा नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याने पक्षाची नाचक्की झाली आहे. येथे विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना भाजपाने उमेदवार बनवले होते. त्यानंतर पक्षाने पुन्हा उमेदवार बदलताना स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेश पाटील यांना उमेदवार बनवले. या प्रकारामुळे पक्षात मोठ्या प्रमाणावर अंतर्गत नाराजी असून, त्याचा फटका पक्षाला बसू शकतो.
12 / 13
उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी मतदारसंघातही विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापत काँग्रेसने भारती पवार यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे हरिश्चंद चव्हाण यांचा गट नाराज आहे.
13 / 13
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र येथे प्रताप पाटील चिखलीकर यांनी चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहेत. तसेच काही पक्षांतर्गत विरोधकच आपल्याला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे अशोक चव्हाणनी नांदेडच्या आपल्या होमपिचवर चक्रव्युहात अडकल्याची चर्चा होत आहे.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस