शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 09:15 IST
1 / 10शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षात उभी फूट पडत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाने खरी शिवसेना आमचीच असा दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत हे प्रकरण पोहचल्यानंतर आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला. 2 / 10केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे-ठाकरे गटाला स्वतंत्र नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यात उद्धव ठाकरे गटाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नवं नाव आणि मशाल हे चिन्ह दिले. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नवं नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे. 3 / 10उद्धव ठाकरेंकडील धनुष्यबाण चिन्ह गेले आणि हाती मशाल आली. मशाल चिन्ह मिळताच ठाकरे गटातील शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. त्याचसोबत मशाल हाती घेऊन निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. परंतु आता पुन्हा ठाकरेंकडील मशाल वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 4 / 10कारण दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत समता पार्टीही त्यांचा उमेदवार देणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मिळालेले मशाल चिन्ह समता पार्टीच्या चिन्हाशी साधर्म्य आहे असं पक्षाने सांगितले आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगालाही कळवण्यात आले आहे. 5 / 10१९९६ पासून मशाल चिन्ह समता पार्टीकडे आहे. त्यामुळे समता पार्टीने घेतलेल्या आक्षेपावर आता बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. २००४ मध्ये समता पार्टीला मशाल चिन्ह देत ते नोंदणीकृत केले आहे असं समता पार्टी महाराष्ट्रने कळवलं आहे. 6 / 10आमचा पक्ष १९९४ पासून राष्ट्रीयकृत पक्ष आहे. जनमाणसांत आमची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह द्यावं अशी विनंती समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश अरुण देवळेकर यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. 7 / 10१९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिज, नितीश कुमार या नेत्यांनी मिळून लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात नवीन पक्ष निर्माण केला होता. त्याला समता पार्टी असं नाव दिले होते. या पक्षाचं चिन्ह मशाल होतं. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत समता पार्टीला ७ जागा मिळाल्या होत्या. तर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत समता पार्टीने भाजपासोबत आघाडी केली होती. 8 / 10१९९६ मध्ये समता पार्टीने बिहारमध्ये ६, उत्तर प्रदेश आणि ओडिशात प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत १२ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे समता पार्टीने केलेल्या दाव्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे. 9 / 10दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच या पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणूनही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोमवारीच मशाल हे चिन्ह मिळाले आहे. 10 / 10मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचविण्याठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र त्याआधीच समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे मशाल चिन्हावरून उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार आहे.