शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"आमच्या नादाला लागायचं नाही म्हणून मोदी, शाहदेखील रस्ता बदलतात"; संजय राऊतांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 3:58 PM

1 / 6
Sanjay Raut vs Eknath Shinde Revolt: एकनाथ शिंदे गट विरूद्ध शिवसेना व महाविकास आघाडी असा सत्तासंघर्ष सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. शिवसेनेने भाजपाशी युती करून सत्ता स्थापन करावी अशी शिंदे गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे. पण याच दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत मात्र या बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. आज झालेल्या दहिसरच्या शिवसेना मेळाव्यात राऊतांनी केवळ बंडखोरांबद्दलच नव्हे तर भाजपाचे सर्वोच्च नेते PM Narendra Modi आणि Amit Shah यांच्याबद्दलही विधान केले.
2 / 6
'शिवसेनेत यायचं, शिवसेनेचे संरक्षण घ्यायचं, प्रॉपर्टी उभ्या करायच्या आणि त्याच पैशाने नंतर शिवसेनेवर वार करायचे असे लोक शिवसेनेत नकोत. अशी घाण परत पक्षात घेऊ नका असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलं. कारण हे किती काळ सहन करावं यालाही मर्यादा आहेत.', अशा शब्दांत राऊतांनी आपली भूमिका मांडली.
3 / 6
'शिवसेनेचे आमदार बंड करत आहेत. पण शिवसेना हा एक मोठा पक्ष आहे. आमदारांना आणि नेतेमंडळींना ताकद आणि बळ हे शिवसेनेने दिलं आहे. हे वैभव शिवसेनेमुळे साऱ्यांना मिळाले आहे. संजय राऊत कोणीही नाही. आपण एकटे दुकटे कोणी नाही. पण शिवसेना या चार अक्षरांनी साऱ्यांना राष्ट्रीय नेते केले.'
4 / 6
'केंद्रातील भाजपा सरकारला महाराष्ट्र तीन भागांमध्ये तोडायचा आहे. विदर्भ वेगळा करायचा आहे. मराठवाडा वेगळा काढायचा आहे. आणि मुंबई केंद्रशासित करायची आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे होऊ देणार नाही हे माहिती असल्यामुळे हे लोक शिवसेना तोडायचा प्रयत्न आहेत.'
5 / 6
'शिवसैनिकांच्या नादाला कोणीही लागत नाही. शिवसैनिकांच्या हातात भगवा झेंडा असतो. याच झेंड्याकडे पाहून अनेक लोक आपल्या नादाला लागत नाहीत. याच्या हातात भगवा झेंडा आहे त्यामुळे वेळप्रसंगी हा झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल असं शिवसैनिकांबद्दल अभिमानाने म्हटलं जातं.'
6 / 6
'शिवसैनिकांना वाघ म्हणतात त्याचं कारण बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. बाळासाहेबांनी जी शिवसेना उभारली त्यामुळे आपल्या नेत्यांना शिवसेनेचा वाघ म्हटलं जातं. आणि म्हणूनच आम्हाला पाहिल्यानंतर यांच्या नादाला लागायला नको यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे देखील रस्ता बदलतात', असं अतिशय मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहShiv Senaशिवसेना