शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे सक्रीय झाले; शिंदे गटातील बंडखोरांना पर्याय शोधले? हुकमी एक्के कामाला लागले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 2:15 PM

1 / 15
शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
2 / 15
राज्यभरातून शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील मैदानात उतरले असून, ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करून शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य भरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
3 / 15
यातच आता शिवसेनेसोबत बंडखोरी करीत आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. असे असताना दुसरीकडे मात्र कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आहे.
4 / 15
तर, दुसरीकडे बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला, मात्र जाधव कुटुंबात राजकीय फूट पडल्याचे दिसत आहे. प्रतापरावांचे धाकटे बंधू आणि माजी नगराध्यक्ष व गटनेते संजय जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्धार केला आहे.
5 / 15
यातच आता पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सक्रीय होत शिंदे गटाविरोधात दंड थोपटले आहेत. ज्या ज्या भागातून बंडखोरी झाली आहे, त्या त्या ठिकाणी शिंदे गटातील नेत्याला पर्यायी तगडा नेता शोधण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 15
शिंदे गटाला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. याचीच झलक उद्धव ठाकरेंनी तीन मतदारसंघात दाखवलीय आणि यानंतर शिवसैनिकांचा वाढलेला उत्साह हा बंडखोरांचं टेन्शन वाढवणारा असल्याचे म्हटले जात आहे.
7 / 15
या मतदारसंघातले जे आमदार आहेत, ते आधी उद्धव ठाकरेंसाठी रडले, पण स्वतःच शिंदे गटात गेले. या संतोष बांगर यांच्यासाठीही शिवसेना पर्याय शोधत आहे. २०१९ च्या निवडणुकीत बांगर यांच्याविरोधात दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या अजित मगर यांनाच शिवसेना पक्षात घेण्याची शक्यता आहे.
8 / 15
वंचित बहुजन आघाडीकडून अजित मगर यांना उमेदवारी मिळाली होती. संतोष बांगर यांच्याकडून १० हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अजित मगर शिवसेनेत आल्यास बांगरांच्या मतांचे विभाजन होऊ शकते तसेच राजीव सातव यांच्यासोबत काँगेसमध्ये काम केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क तितकाच दांडगा असल्याचे सांगितले जात आहे.
9 / 15
आदित्य ठाकरे स्वतः प्रत्येक मतदारसंघात जात आहेत. उद्धव ठाकरेही लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत.. पण त्याआधी तीन मतदारसंघात फासे टाकून पुढच्या खेळीची झलक उद्धव ठाकरेंनी दाखवल्याचे बोलले जात आहे.
10 / 15
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपातून आलेल्या सदाशिव लोखंडेंना शिवसेनेने खासदार केले. बबनराव घोलप इथे शिवसेनेचे उमेदवार होते, पण तांत्रिक कारणावरुन त्यांची उमेदवारी बाद झाली आणि लोखंडेंना लॉटरी लागली.
11 / 15
बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी शिर्डी मतदारसंघ गाठला. या मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंच्या स्टेजवर बबनराव घोलप यांचीही एंट्री झाली.. घोलप यांची एंट्री होताच शिवसैनिकांनी भावी खासदार अशी घोषणाबाजी केली. यातून एक थेट मेसेज देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
12 / 15
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे हेमंत पाटील इथे खासदार आहेत. हेमंत पाटलांचे प्रतिस्पर्धी सुभाष वानखेडे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याने पाटील यांचे टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे. वर्षभरापासून वानखेडे शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चा होत्या.
13 / 15
अखेर शिवसेनेचे तीन वेळा आमदार, एक वेळा खासदार राहिलेले वानखेडे यांना अखेर मुहूर्त मिळाला. खासदार हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्याने त्यांना जशाच तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेने हुकुमी पत्ता पक्षात आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
14 / 15
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना आपल्या तंबूत घेण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. कोल्हापुरात माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सुजित मिणचेकर यांची नावे भाजप प्रवेशाच्या चर्चेत आहेत. सांगली जिल्ह्यातील काही नेते भाजपच्या मार्गावर आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत मदत होईल, असे प्रमुख कार्यकर्ते हेरण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
15 / 15
गेल्या सात आठ वर्षात भाजपने दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या हातात कमळ दिले. दोन वर्षातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला टक्कर देत विजयाचा झेंडा फडकवू शकणारे अथवा फडकविण्यास हातभार लावू शकणारे नेते आता भाजपला हवे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण