1 / 9अवघ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून ह्रदयाच्या कोंदणात जपलेला शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सकाळी मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडावर साजरा झाला. 2 / 9कोरोना संकटाच्या काळातही शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. लॉकडाऊन आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हा सोहळा संपन्न झाला.3 / 9शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटावर मात करत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन अनेक लढाया जिंकण्याचा महापराक्रम केला, तोच आदर्श आणि तीच परंपरा डोळ्यासमोर ठेऊन कोरोना संसर्गाच्या आणि लॉकडाऊनच्या काळात रायगडावर मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.4 / 9अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन समितीच्यावतीने २००७ पासून शिवराज्याभिषक दिन सोहळा साजरा केला जात असून गेल्या बारा तेरा वर्षात या सोहळ्याला लोकोत्सवाचे स्वरुप येत आहे. 5 / 9सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मावळ्यांची संख्या वर्षागणिक वाढतच आहे. परंतू यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनची स्थिती याचा विचार करुन यावर्षी हा सोहळा अत्यंत साधेपणाने आणि मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय सोहळा समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला होता. 6 / 9छत्रपतींचा आदर्श आणि शासनाचे आदेश याचे तंतोतंत पालन करत हा सोहळा ठरल्याप्रमाणे साधेपणाने पार पडला.7 / 9पावसाची रिपरिप आणि दाट धुक्याने रायगडावर शनिवारची पहाट झाली. गडाला दाट धुक्याचा वेढा खूप वेळ राहिला. पाऊस आणि धुक्याला सुद्धा हा सोहळा पाहण्याची आस लागली असावी असेच तेथील वातावरण होते.8 / 9नगारखान्यासमोर युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तेथूनच शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास सुरवात झाली. ध्वजारोहण झाल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज शहराजीराजे छत्रपती यांनी उत्सव मूर्ती घेऊन राजसदरेकडे प्रस्थान केले. 9 / 9यावेळी अखंड जयघोष झाला. जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी रायगडाचा आसमंत भेदला.