ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 25 - अर्थकारणातून समाजकारण आणि शिक्षणापासून जनकल्याणापर्यंत झटणाऱ्या राज्यभरातील दिग्ग्जांच्या यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडंट हॉटेलमध्ये ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अॅवॉर्ड’ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे. ‘लोकमत समूहा’कडून तळागाळात काम करणाऱ्यांसह उद्योगापासून कॉर्पोरेटपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या यशस्वी दिग्गजांना गौरवण्यात येते. राष्ट्रीय स्वरूप असलेल्या ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अॅवॉर्ड’चे यंदा तिसरे वर्ष आहे. या गौरव सोहळ्याला राजकीय क्षेत्रासह कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, हॉटेल उद्योजक विठ्ठल व्यंकटेश कामत यांच्यासह ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा या मान्यवरांची ‘लोकमत गौरव पुरस्कार’ सोहळ्याला उपस्थिती असणार आहे.आऊटडोअर मीडिया, रिटेल, फॅशन, उद्योग, परवडणारी घरे, दंतचिकित्सा, नेतृत्वशाली महिला, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विपणन, ग्राहक सेवा, शाश्वत नेतृत्वशैली, बांधणी आणि संरचना, औषध निर्मिती आणि विपणन, तंत्रज्ञान, दुग्धउत्पादन, पर्यावरणपूरक विकास, अतिथी आदरातिथ्य, आरोग्य सेवा, आयुर्वेद आणि पर्यावरणपूरक प्रकल्प या क्षेत्रांत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सिलन्स अॅवॉर्ड’ने गौरवण्यात येणार आहे. ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सीलन्स अॅवॉर्ड’चे टायटल स्पॉन्सर थारवानी ग्रुप असून, रिजन्सी ग्रुप ‘पॉवर्ड बाय’ आहेत.