शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विचित्र योगायोग! राहुल गांधींच्या पहिल्या यात्रेपूर्वीही एका नेत्याने राजीनामा दिलेला, ते ही होते सांगता स्थळ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:12 PM

1 / 7
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आजपासून 'भारत जोड़ो न्याय यात्रा' सुरु होत आहे. या यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. परंतु, त्यापूर्वीच मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडली आहे. ते आज दुपारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच काँग्रेसच्या पहिल्या यात्रेवेळी देखील काँग्रेसच्या एका नेत्याने सोडचिठ्ठी दिली होती, त्यात आणि देवरांच्या राजीनाम्याचा संबंध जोडला जाऊ लागला आहे.
2 / 7
काँग्रेसची पहिली भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर २०२२ ला सुरु झाली होती. त्यापूर्वी ११ दिवस गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या दोन घटनांचा आणखी एक योगायोग म्हणजे दोन्ही नेते हे काँग्रेसच्या यात्रा संपण्याच्या ठिकाणाचे आहेत.
3 / 7
भारत जोडो यात्रा ३० जानेवारीला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपली होती. तर आताची न्याय यात्रा २० मार्चला मुंबईत संपणार आहे. गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री होते. तर देवरा हे दक्षिण मुंबईचे खासदार होते.
4 / 7
देवरा यांनी ज्या जागेवरून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे ती जागा त्यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निववडणुकांमध्ये गमावलेली आहे. तर शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दोनवेळा तिथून खासदारकी मिळविली आहे. यामुळे मविआत देवरांपेक्षा सावंतांनाच ती जागा सुटणार होती.
5 / 7
युतीमध्ये ही जागा शिवसेनेची होती. शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे. यामुळे देवरांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नव्हती. या राजकीय गणितांवर देवरा शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. निवडणूक आयोगापाठोपाठ शिंदेंचीच शिवसेना असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी देखील स्पष्ट केले आहे. यामुळे भाजपाशी वाटाघाटीत ही जागा आता तिथलाच नेता आल्याने शिवसेनेला सुटण्याची जास्त शक्यता आहे.
6 / 7
दोनवेळचा खासदार उद्धव ठाकरेंसोबत असल्याने शिंदे गटाला या जागेवर मतदारांमध्ये नवखा चेहरा नको होता. देवरा यांच्यामुळे दोनवेळा हरलेला का असेना ओळखीचा चेहरा शिंदेंना मिळाला आहे. त्यात भाजपाची मते सोबतीला असणार आहेत. बाकी राजकारणासाठी देवरा उपयुक्त नसले तरी एक जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी शिंदे गटाला देवरा हवेसे वाटू लागले होते. यामुळे देवरा-शिंदे यांच्यातील या डीलचा दोघांनाही फायदा होणार आहे.
7 / 7
जर असेच घडले तर लोकसभेला शिंदे विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी थेट लढाई दक्षिण मुंबई मतदारसंघात पहायला मिळणार आहे. त्यात शिंदेंकडे या मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नाहीय म्हणून भाजपाने तयारी सुरु केली होती. यामुळे भाजपातही इच्छुक नेते होते. यातच ठाकरे गटाचा एक मातब्बर नेत्यालाही फोडण्याचे प्रयत्न सुरु होते. या भाजपाच्या प्रयत्नांना आता खीळ बसण्याची शक्यता आहे.