शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! तानाजी सावंतांच्या मुलाने प्लेनवर केला ६८ लाखांचा खर्च?; अपहरण नाट्यातील नवी माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:34 IST

1 / 8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे कथित अपहरण नाट्याची कालपासून जोरदार चर्चा होत आहे.
2 / 8
तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज सावंत हे सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हे एका स्विफ्ट कारमध्ये बसून पुणे विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ऋषिराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्याने तानाजी सावंत यांनी थेट पोलिस आयुक्तांचे कार्यालय गाठले.
3 / 8
ही माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली. ऋषिराज नेमका विमानतळावरून कुठे गेला याची माहिती घेतली असता तो चार्टर्ड विमानाने बँकॉकला जात असल्याचे समोर आले. विमान भारताच्या हद्दीत असतानाच एटीसी (एअर ट्राफिक कंट्रोल) कडून पायलटला चार्टर्ड परत पुण्याला घेऊन येण्याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार रात्री नऊच्या सुमारास चार्टर्ड पुन्हा लोहगाव विमानतळावर लँड झाले.
4 / 8
ऋषिराज सावंत याच्यासोबत विमानामध्ये त्याचे अन्य दोन मित्रही होते. या तिघांनी बँकॉकला फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता आणि त्यासाठी तब्बल ६८ लाख रुपये खर्चून चार्टर्ड प्लेन बुक करण्यात आले होते, असं सांगितलं जात आहे.
5 / 8
कुटुंबियांना कोणतीही कल्पना न देता फिरायला जाण्याचा ऋषिराज सावंत यांचा प्लॅन फसला आणि त्यांना अर्ध्या वाटेतूनच माघारी यावं लागलं.
6 / 8
सुरुवातीला मुलगा बेपत्ता झाल्याचं सांगणारे तानाजी सावंत यांनी नंतर बोलताना म्हटलं की, 'मुलगा बेपत्ता किंवा त्याचे अपहरण झाले आहे, असे काहीही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. ऋषिराज अगदी जवळपास जाणार असेल, तरी मी इथे जात आहे, असे सांगतो; पण यावेळी ते तिघेजण दुसऱ्याच गाडीतून गेल्याने मी अस्वस्थ झालो. याबाबत त्याने कोणालाही माहिती सांगितलेली नाही. दिवसातून कमीत कमी १५ ते २० फोन एकमेकांना होतात आणि त्यात फोनही न आल्याने हा अचानक एअरपोर्टवर कशाला गेला? या विचाराने त्यामुळे मी अस्वस्थ झालो. त्यानंतर मी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली, असं सांगितलं.
7 / 8
एवढीच तत्परता सामान्यांसाठी का नाही? अनेक नियम, कायदे दाखवत, अपहरणाची तक्रार लगेच दाखल करता येत नाही, २४ तासांपूर्वी हरवल्याची तक्रार घेता येते, २४ तासांनंतर संबंधित व्यक्ती सापडली नाही, तर अपहरणाचा गुन्हा दाखल करता येतो, असे सांगतात. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्याबाबतीत मात्र ऋषिराज सावंत पोलिसांनी कंट्रोल रूमला आलेल्या फोनवरून सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
8 / 8
तानाजी सावंत यांनी ते सत्ताधारी पक्षात असल्याचा फायदा घेत पोलिस यंत्रणेला वेठीस धरले. एवढीच तत्परता पोलिस प्रशासन सर्वसामान्यांसाठी कधी दाखवत नसल्याने पुणेकरांमधून दुटप्पीपणावर रोष व्यक्त केला जात आहे.
टॅग्स :PuneपुणेTanaji Sawantतानाजी सावंतShiv SenaशिवसेनाPoliceपोलिसKidnappingअपहरण