मुंबई, दि. 9 - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देणा-या मुस्लिम समाजाने आज मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना अल्पोपहार आणि पाणी वाटप केले. यावेळी मराठा आंदोलकांनीही टाळयांच्या कडकडाटात त्यांचे आभार मानले. जेजे उड्डाणपूल सुरु होण्याआधी नागपाडा येथे सिग्नलजवळ खास स्टॉल उभारण्यात आला होता. आंदोलक तिथे दाखल होताच मुस्लिम नागरीकांनी अल्पोहाराचे वाटप सुरु केले. यावेळी दोन्ही समाजातील एकोपा दिसून आला.नागपाडा फ्रूट आणि व्हेजिटेबल असोसिएशन, ऑल इंडिया मिल्ली कौन्सिल आणि रेहमानी ग्रुप व रजा अकादमी, जमात ए उलेमा यांनी तीन स्टॉल लावले होते. त्यामाध्यमातून अल्पोपहार व पाणी वाटप करण्यात आले.भायखळयाच्या जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला हा मोर्चा आझाद मैदानच्या दिशेने मार्गक्रमण करत असून, लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक या मोर्चात सहभागी झाले आहेत. संपूर्ण जे.जे. उड्डाणपूल आंदोलकांनी भरुन गेला आहे. मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यासाठी काढण्यात आलेला हा 58 वा क्रांती मोर्चा आहे. आधीच्या मोर्चाप्रमाणे हा मोर्चाही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत असून, मूक मोर्चा असल्याने यात कुठलीही घोषणाबाजी करण्यात आलेली नाही.