There will be no Dahihandi of Jitendra Awhad in Thane this year
गोविंदाचा हिरमोड! ठाण्यात यंदा जितेंद्र आव्हाडांची 'संघर्ष' दहिहंडी नाही, कारण.. By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 7:22 PM1 / 9तब्बल २ वर्षांनी लॉकडाऊनंतर मुंबई, ठाण्यात दहिहंडी उत्सव जोरानं साजरा होणार आहे. मात्र यंदा ठाण्यातील मानाची दहिहंडी म्हणजे पाचपाखाडी येथील जितेंद्र आव्हाडांनी आयोजित केलेली हंडी. या दहिहंडीने जगभरात नावलौकीक मिळवला. 'संघर्ष' प्रतिष्ठानच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड ही हंडी उभारत होते. 2 / 9मात्र यंदा ठाण्यात ही दहिहंडी आयोजित होणार नाही त्यामुळे गोविंदा पथकाचा हिरमोड झाला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, दहिहंडीवरील निर्बंधाबाबत हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयात सरकारविरोधात मी लढाई केली. दहिहंडीवर जी बंधन आली त्यानंतर दहिहंडी करण्यास रस नाही. उंचीला स्थगिती, वयावर निर्बंध त्यातून दहिहंडी साजरी होऊ शकत नाही. 3 / 9१९९९ मध्ये मी पहिल्यांदा दहिहंडी आयोजनात उतरलो. तेव्हा मी ९ वाजता स्टेजवर चढायचो, रात्री ११ ला खाली उतरायचो. ती एनर्जी, ताकद, आवाज आणि जोश आता राहिला नाही. ते आता होईल वाटत नाही. मी स्वत: घाबरतोय. मी ज्याप्रकारे सगळं हाताळायचो. दहिहंडीची क्रेझ लोकांमध्ये आहे. कधी ना कधी यातून निवृत्त व्हायला हवं. वाढतं वय, एनर्जी याचा विचार करून वॉकआऊट केले आहे असं आव्हाड म्हणाले. 4 / 9आपली ताकद किती हे ओळखायला हवं. सकाळी ९ ते रात्री ११ सातत्याने बोलणे आता शक्य नाही. दहिहंडीच्या दिवशी मी बाहेर पडत नाही. लांब निघून जातो. एकट्याला कोंडून घेतो हा सगळा माहोल पाहून आपली दहिहंडी नाही याची खंत मनाला वाटत असते असंही आव्हाडांनी म्हटलं. 5 / 9त्याचसोबत मी स्वत: चाळीत वाढलो आहे. दहिहंडीत भाग घेतला आहे. रस्त्यावर पडून मी कोमात गेलो होतो. थर लावताना मरता मरता वाचलो आहे. त्यामुळे या खेळाबद्दल प्रचंड आकर्षण, प्रेम आहे. या खेळात कुठलाही धर्म, जात, निळा, गोरा, काळा बाद करून एकमेकांना घट्ट बिलगून माणसं उभी असतात. खालचा थर मजबूत असला तर वरचा माणूस सुरक्षित राहतो हे या खेळातून शिकायला मिळतं असं आव्हाड यांनी सांगितले. 6 / 9दहिहंडी साजरी होतेय याचा आनंद आहे. मुंबईची ओळख दहिहंडी होती. मुस्लीम, हिंदू सगळे एकत्रित येऊन साजरा करतात. दहिहंडीत जो अनुभव घेतले ते खरोखरच वेगळे होते. जय जवान आणि श्रीदत्त माझगावचं ताडवाडीचे मुलं आमनेसामने आले. तेव्हा मी समोर गेलो आदराने दोन्ही गट बाजूला झाले. आपुलकी, प्रेम होते. कधीही माझ्या दहिहंडीत मारहाण, छेडछाड झाली नाही असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. 7 / 9राष्ट्रवादीचे नेते व ठाण्यातील संघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी आयोजक जितेंद्र आव्हाड यांनी दहिहंडीला ग्लोबल स्वरुप प्राप्त करून दिले. दहावा थराला २५ लाखांचे बक्षिस, नऊ थर लावणा-यांना १५ लाख, आठ थर लावणा-या पथकाला १ लाख रूपये तर, सात थर लावणा-या गोविंदा पथकाला २५ हजार रूपये अशी भरघोस बक्षिसे ठेवली जात होती. आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठानने महिला दहीहंडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी महिला पथकांना स्वतंत्र बक्षिसे ठेवली होती. 8 / 9मागील ३ दशकांपासून ठाण्यात संघर्ष प्रतिष्ठानची दहिहंडी आयोजित करण्यात येते. स्वत: जितेंद्र आव्हाड या हंडीचे आयोजक असतात. या दहिहंडीला मुंबई, ठाण्यातील १०० हून गोविंद पथकं हजेरी लावतात. मुंबई, ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात एक मोठी दहिहंडी म्हणून आव्हाडांच्या दहिहंडीचा विशेष उल्लेख केला जातो. या दहीहंडीसाठी माणसांच्या गर्दीचा महापूर येतो. यामध्ये लाखो रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बक्षिसं जिंकणाऱ्या गोविंदा पथकांना दिली जातात.9 / 9ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या 'संघर्ष' या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंडळाचा दहीहंडी उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याठिकाणी सेलिब्रेटींचीही अनेक मान्यवरांची गर्दी असते. पण, यंदा असं काहीच दिसणार नाही. कोरोना लॉकडाऊनमध्ये दहिहंडी बंद झाली मात्र यंदा निर्बंध नसले तरी दहिहंडीवरील बंधन यामुळे आव्हाडांची दहिहंडी नसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications