शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

म्हणून शरद पवारांनी नेमले दोन कार्यकारी अध्यक्ष, अजित पवारांना दिली नाही कुठलीही जबाबदारी, अशी आहे इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 5:06 PM

1 / 7
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारी घटना आज दुपारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनाच्या प्रसंगी मोठी घोषणा करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली. तसेच अजित पवार यांच्याकडे कुठलीही जबाबदारी सोपवली नाही.
2 / 7
शरद पवार यांनी या निर्णयांमधून महत्त्वाकांक्षी अजित पवार यांना योग्य तो राजकीय संदेश दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तराधिकारी ह्या सुप्रिया सुळेच असतीत, असे स्पष्ट संकेतही शरद पवार यांनी आजच्या घोषणेतून दिले आहेत. त्यामुळे या घोषणांमागचं नेमकं गुढ काय आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
3 / 7
शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण असेल, असा प्रश्न जेव्हा विचारला जायचा तेव्हा पवारांचे उत्तराधिकारी अजित पवार असतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात असे. राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आहे, उद्या मुख्यमंत्रिपदाची संधी चालून आल्यास अजित पवारांच्या नावाची दावेदारी सर्वात पुढे असेल. मात्र आता शरद पवारांनी खेळी करत सर्व चर्चेचा रोख अजित पवार यांच्याकडे वळवला आहे. तसेच त्यांना एकप्रकारे पक्षातून बाजूला केलं आहे.
4 / 7
मात्र अजित पवार यांना उत्तराधिकारी बनवायचं नव्हतं आणि सुप्रिया सुळे या प्रश्नाचं भविष्यातील उत्तर असतील, असं शरद पवारांना सूचित करायचं होतं. तर त्यांनी दोन कार्यकारी अध्यक्ष का नियुक्त केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
5 / 7
या प्रश्नाचं उत्तर हल्लीच दोन मे रोजी झालेल्या घडामोडींमध्ये आहे. शरद पवार यांनी २ मे रोजी ज्या पद्धतीनं राजीनामा दिला, त्यानंतर पक्षामध्ये खूप खलबतं झाली. तसेच कार्यकारी अध्यक्ष बनवण्याचा विचार समोर आला. निवडणुका होण्यास आता केवळ एक वर्षाचा अवधी उरला आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी पक्षातून बाजूला होणं नुकसानकारक ठरू शकतं, असा विचार मांडण्यात आला. त्यातूनच ही दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती झाली आहे.
6 / 7
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही वैचारिकदृष्ट्या दोन गट आहेत. २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींवरून त्याला व्यवस्थित समजून घेता येऊ शकतं. त्यावेळी एका गटाला भाजपासोबत सरकार स्थापन करावं, असं वाटत होतं. तर सुप्रिया सुळे आणि इतर काही नेते काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करणे योग्य मानत होते. तो अनुभव विचारात घेऊनच दोन गटांमधून दोन कार्यकारी अध्यक्ष निवडले गेले आहेत.
7 / 7
दुसरीकडे केवळ सुप्रिया सुळे यांनाच कार्यकारी अध्यक्ष बनवलं असतं तर त्याच शरद पवार यांच्या उत्तराधिकारी आहेत, असा स्पष्ट संदेश गेला असता. मात्र ही बाब सध्यातही उघडपणे समोर येऊ नये, असं शरद पवारांना वाटतं. बाळासाहेब ठाकरे यांनी अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवून ते उत्तराधिकारी असल्याचे संकेत दिले होते. मात्र शरद पवार सध्या तसं करू इच्छित नाहीत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली गेली.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस