शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्धव ठाकरेंनी केली शरद पवार आणि काँग्रेसची कोंडी; विधानसभेआधी मविआत तणाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 5:54 PM

1 / 16
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला.
2 / 16
या मेळाव्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य आणि केंद्रातील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचं सरकार आणायचं आहे, असं म्हणत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
3 / 16
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका मागणीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
4 / 16
'आपल्यात काड्या घालणारी लोकं युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो... इथं शरद पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
5 / 16
'मी माझ्यासाठी लढत नाही. जेव्हा मी मुख्यमंत्रिपद सोडलं, त्यानंतरही मी जो लढतोय तो स्वत:च्या स्वार्थासाठी लढत नाही. मी महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि महाराष्ट्राला झुकवण्याची हिंमत कोणातही नाही. महाराष्ट्राला झुकवण्याची जो कोणी हिंमत करतो, त्याला आम्ही गाडून टाकतो, या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली.
6 / 16
मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर न करता निवडणुकांना सामोरे गेलो तर कोणता धोका आहे, हेदेखील उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं.
7 / 16
'मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर न करता आपण निवडणुकीला सामोरे गेलो तर आपआपसांत पाडापाडी केली जाते, असा आमचा युतीमधील अनुभव आहे. कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मु्ख्यमंत्री, असं म्हटलं की दुसऱ्या पक्षाच्या जास्त जागा येऊ नये म्हणून पाडापाडी केली जाते, त्यामुळे कोणालाही करा पण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
8 / 16
मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करून उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसह काँग्रेसच्याही नेत्यांची कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे.
9 / 16
निवडणुकीच्या निकालानंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपद ठरवलं जावं, अशी शरद पवार यांच्या पक्षासह काँग्रेसचीही आतापर्यंतची कार्यपद्धती राहिली आहे.
10 / 16
'निवडणुकीआधीच मला मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंची असेल तर ते चुकीचं आहे. याला काँग्रेस पक्षासह इतर घटकपक्षही मान्यता देणार नाहीत,' असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
11 / 16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला अनपेक्षितरीत्या घवघवीत यश मिळालं. काँग्रेसने लढवलेल्या १७ जागांपैकी तब्बल १४ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले.
12 / 16
१४ खासदारांसह काँग्रेस महाराष्ट्रातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे साहजिकच पक्षाची विधानसभा निवडणुकीतील बार्गेनिंग पॉवरही वाढणार आहे.
13 / 16
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ९ खासदार निवडणूक आले असले तरी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच सर्वांत कमी स्ट्राइक रेट राहिला आहे.
14 / 16
या सर्व पार्श्वभूमीवर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, या सूत्रानुसार विधानसभा निवडणुकीला सामोरे गेल्यास आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता धूसर होते, ही बाब उद्धव ठाकरे यांनी हेरली असल्याचं त्यांच्या ताज्या भूमिकेतून दिसत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
15 / 16
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा निवडणुकीआधी जाहीर करावा, अशी मागणी करून आता मित्रपक्षांची कोंडी केल्याने आगामी काळात महाविकास आघाडीत तणाव निर्माण होऊ शकतो.
16 / 16
मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्माण होणारा संभाव्य पेच महाविकास आघाडीचे नेते कसा सोडवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवार