ऑनलाइन लोकमतसोलापूर/करमाळा, दि. २४ - यंदा उजनी धरणातील पाणीपातळी खालावल्याने धरण निर्मितीवेळी पाण्यात बुडालेल्या पुरातन मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर उघडे पडले असून, पुरातन मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धरण निर्मितीच्यावेळी गावं उठवली, मंदिरे तशीच ठेवली गेली, ती मंदिरे, पूल, वाडे उजनीच्या पाण्यात लपली. पण आता पाणी कमी झाल्याने उठलेली गावं, मंदिरे आणि त्याची शिखरे पाणी कमी झाल्ंयाने बाहेर येऊन खुणावू लागली आहेत. उजनी धरणात करमाळा तालुक्यातील वांगी, चिखलठाण, कंदर, कुगाव, पारेवाडी, केत्तूर, पोमलवाडी, बिटरगाव, सांगवी, ढोकरी, टाकळी, कोंढारचिंचोली ही २८ गावे पाण्याखाली बुडाली. हजारो एकर शेतजमीन, मोठमोठे वाडे, मंदिरे पाण्यात बुडाली. त्या सर्व गावांचे धरण निर्मितीनंतर नवीन जागेत पुनर्वसन झाले आहे.उजनी धरणाची पाणीपातळी यंदा कमालीची खालावली आहे, त्यामुळे करमाळा तालुक्यातील वांगी, पोमलवाडी, केत्तूर, कुगाव या जुन्या गावठाणातील जुने वाडे, मंदिरे पाण्याच्या बाहेर खुणावू लागले आहेत. वांगी हद्दीतील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा व नागनाथ या चार मंदिराचे अवशेष पाण्याबाहेर उघडे पडले आहेत. उघडे पडलेले मंदिर पूर्वी कसे होते हे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.पोमलवाडी-केत्तूर भागातील ब्रिटिशकालीन जुना पूलही पाणी कमी झाल्याने उघडा पडला आहे. उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने वांगी गावच्या जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, खंडोबा, लक्ष्मी, नागनाथ ही चार मंदिरे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. मंदिरांचे हेमाडपंथी बांधकाम असल्याने आजही ह्यजैसे थेह्ण बांधकामाचे अवशेष आहेत. विशेष आकर्षण ठरलेल्या या बांधकामाचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक होड्या घेऊन पाहणी करू लागले आहेत.- सतीश चोपडे, ग्रामस्थ, वांगी उजनी धरणातील पाण्याची पातळी खालवली आहे, धरणाची निर्मीती झाल्यापासून ही पहिलीच वेळ आहे. यावरुन आपल्याला दुष्काळाचे भीषण चित्र दिसत आहे. पाण्याची पातळी खालवल्यामुळे उजणा धरणाच्या कडेचा परिसर अतिशय सुंदर दिसत आहे. याचा फायदा घेत नागराज मुंजळे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटातील बरेचं, शुटींग केले आहे.