ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात देशभरातील रिझर्व्ह बँकांना घेराव घालण्यात येत आहे. नागपुरातील रिझर्व्ह बँकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी बॅकिकेट तोडून आरबीआय कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. नागपुरात पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विलास मुत्तेमवार यांच्यासह अनेक नेतेही सहभागी झाले आहेत. दरम्यान, जोपर्यंत लाठीचार्ज करणारे अधिकारी निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, अशी भूमिका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान, आगामी पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली. तसंच मोदींनी सहारा इंडिया आणि आदित्य बिर्ला ग्रुपकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा पुरावाही सापडल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतील सीएसटी येथून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर गुजरातमधील अहमदाबादमध्ये नोटाबंदीविरोधातील आंदोलनात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, शंकरसिंह वाघेला यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. https://www.dailymotion.com/video/x844oo9