ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला सुरुवात झाली आहे. नव्या गणवेशात पहिल्यांदाच स्वयंसेवकांचं पथसंचलन सुरु आहे. संघाच्या गणवेशात फुलपॅन्टचा समावेश झाल्यानंतरचा हा पहिला विजयादशमी उत्सव राहणार आहे. रेशीमबागेत हे पथसंचलन सुरु आहे. हाफपॅन्ट ही संघाच्या गणवेशाची ओळख होती. या वर्षी संघाने गणवेशात बदल केला व हाफपॅन्टची जागा फुलपॅन्टनने घेतली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आर्थिक सेवेचे १९७६ बॅचचे अधिकारी व अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे संरक्षक सत्यप्रकाश राय हे उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवतदेखील संघाच्या नव्या गणवेशात दिसत आहेत. विजयादशमी उत्सवात ते प्रथमच गणवेशाच्या फुलपॅन्टमध्ये दिसत आहेत. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. सर्जिकल स्ट्राईकवरून देशातील राजकारण तापले असताना सरसंघचालक एकूण परिस्थितीबाबत काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी संघाच्या पथसंचलनात दुप्पट स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. आतापर्यंत संघाच्या स्वयंसेवकांचे जवळपास 10 हजार गणवेश विकले गेले आहेत. संघाच्या पथसंचलनानंतर व्यायाम, योग, दंड, घोष, सांघिक गीत हे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.