ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - बॉम्बे हाऊसमध्ये छायाचित्रकारांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी पत्रकार-छायाचित्रकारांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकार आणि छायाचित्रकार सहभागी झाले आहेत. हुतात्मा चौक ते बॉम्बे हाऊसपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून पत्रकारांनी बॉम्बे हाऊससमोरील रस्त्यावर धरणे धरले आहे. तोंडावर काळी पट्टी लावून पत्रकार, छायाचित्रकारांची निदर्शनं सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान, पत्रकार सुरक्षा कायदा करण्याची मागणी पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच पत्रकार आणि छायाचित्रकारांना मारहाण करणा-यांवर अजामिनपात्र गुन्हे दाखल करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे. दरम्यान, निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे हाऊसबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. फोटो - विशाल हळदे