ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. ५ - मीरा रोड येथील डेल्टा बिल्डिंगसह अन्य तीन ठिकाणच्या सात बोगस कॉल सेंटरवर ठाणे पोलिसांनी छापा मारला आहे. टॅक्स रिव्हिजनच्या नावाखाली अनेकांना गंडा घालण्यात आला असून, काहीशे कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याची माहिती मिळत आहे. ठाणे पोलिसांच्या २०० जणांच्या पथकाने ही कारवाई केली. ठाणे पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई असून, जवळपास ५०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कॉल सेंटरमधून टॅक्स रिव्हिजनसाठी खासकरुन अनिवासी भारतीयांना लक्ष्य केले जायचे. काशिमीरा येथील रॉयल कॉलेज - डेल्डा गार्डनजवळील हरिओम आयटी कॉल सेंटर इमारत आणि मीरा रोडच्या शिवार उद्यान समोरील एम.बाले हाऊस व लॉरेक्स इम्पेक्टस येथे पोलिसांनी धाड मारली. या कॉल सेंटर्समधून अनेक आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात आले असून, हे मोठ आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचीही शक्यता आहे. पोलिसांनी याबद्दल नेमकी माहिती दिलेली नाही पण दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत मोठा गौफ्यस्फोट होऊ शकतो.