ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. २३ - अहमदनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील लाखो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. नगरमधील ज्या कोपर्डी अत्याचाराच्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे, त्या नगरमध्येच मोर्चा असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या मोर्चाकडे लागलं आहे. मराठा समाजाचे राज्यभरात जितके मोर्चे निघाले त्यातील आजचा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरण्याची शक्यता आहे. मराठा महाक्रांती मोर्चासाठी अहमदनगर येथे पहाटेपासून शहरात मोर्चेकरी दाखल होण्यास सुरुवात झाली. मनमाड रोड, औरंगाबाद रोड, कल्याण रोड व पाथर्डी रोडवरून चारचाकी, दुचाकी वाहने भगवे व काळे झेंडे लावून येत आहेत. पत्रकार चौकात वाहने थांबवून नागरीकांचे जत्थेच्या जत्थे पायी चालत वाडिया पार्क मैदानाकडे जात आहेत. क्रीडा संकुलासह नगरचे सर्व रस्ते गर्दीने तुडुंब भरले आहेत. दरम्यान कोपर्डीत ज्या पीडित मुलीवर अत्याचार झाला तिचे वडीलही आजच्या मोर्च्यात सहभागी झाले आहेत. ' माझ्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना फाशी व्हावी. लाखो मराठा नागरीक रस्त्यावर आले, त्या सर्वांचा मी आभारी आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्वयंसेवक व पोलीस कर्मचारी मोर्चेकरांना मार्ग दाखवीत आहेत. सहभागी नागरिकांपैकी अनेकांनी हाती मराठा क्रांती मोर्चा असे लिहलेले ध्वज घेतले असून टोप्या घातलेल्या आहेत. दरम्यान नियोजन समितीचे कार्यालय असलेल्या ओम गार्डनमध्ये राजकीय नेते विरोधी पक्षनेते राधाकृष्णव विखे, आ.शिवाजी कर्डिले, भाई जगताप, बबनराव पाचपुते, सुधीर तांबे आदी उपस्थित होते. दरम्यान आज चांदणी चौकात आठ मुली मागण्या मांडणार आहेत, तर एक मुलगी निवेदन करणार आहे.