शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देवेंद्र फडणवीसांचा अंदाज खरा ठरला; अखेर शिवसेना आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 5:27 PM

1 / 10
अलीकडेच झालेल्या राज्यसभेच्या निकालानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला, संख्याबळ नसतानाही भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत अपक्ष आणि घटकपक्षांनी मविआची साथ सोडल्याचं पाहायला मिळालं.
2 / 10
आता राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, महाविकास आघाडीत असमन्वय आहे. त्यामुळे आमदारांची नाराजी उफाळून येणार आहे. आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
3 / 10
त्यातच आता शिवसेना आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं समोर आले आहे. परंतु भाजपाकडून नव्हे तर मित्रपक्षाकडूनच शिवसेनेसमोर नवं टेन्शन निर्माण करण्यात आले आहे. मविआतील मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेना समर्थक आमदारांना फोन लावण्यास सुरूवात केली आहे.
4 / 10
मतांची जुळवाजुळव करण्यात काहीही गैर नाही असं काँग्रेस नेते म्हणत आहे. काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी ८ मतांची गरज आहे. त्याचसोबत राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी ४ मतांची गरज आहे.
5 / 10
शिवसेना आमदारांच्या संख्याबळावर त्यांचे २ उमेदवार सहज निवडून येतील. परंतु आता काँग्रेस-राष्ट्रवादीला सेना आमदार फोडण्याची वेळ आली आहे. कारण या निवडणुकीत आपआपण पाहून घ्या असं शिवसेनेकडून सांगण्यात आल्याचं पुढे आले आहे.
6 / 10
राज्यसभेत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली. त्यात आता विधान परिषदेत मित्रपक्षांनीच फोडाफोडी सुरू केल्यानं उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण झालं आहे. काँग्रेसनं या निवडणुकीत भाई जगताप यांच्या रुपाने अतिरिक्त उमेदवार दिला आहे.
7 / 10
अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नसल्याने आता या निवडणुकीत २६ मतांचा कोटा पूर्ण करावा लागेल. शिवसेनेकडे ५५, काँग्रेसकडे ४४ तर राष्ट्रवादीकडे ५१ जागा असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे.
8 / 10
त्यात शिवसेनेला पाठिंबा असलेल्या अपक्ष आमदारांची मते फोडण्यासाठी काँग्रेसनं हालचाली सुरू केल्या आहेत. शंकरराव गडाख, बच्चू कडू, आशिष जयस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील ही शिवसेनेचे समर्थक आमदार आहेत.
9 / 10
विधान परिषदेच्या १० जागा आहेत. त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसनं भाई जगताप, भाजपानं प्रसाद लाड यांना अतिरिक्त उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. लाड यांना १३ मतांची तर भाई जगतापांना ८ ते १० मतांची गरज आहे.
10 / 10
त्यात भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. राज्यसभेच्या आकड्यांच्या खेळात फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली होती. त्यामुळे विधान परिषदेतही तोच चमत्कार करण्यात भाजपाला यश येते का हे पाहणे गरजेचे आहे.
टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा