ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १४ - सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतीय सण. वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळेच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटते.सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. यावर्षी गुरूवार १४ जानेवारी रोजी रात्री १२ नंतर सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करत असल्याने मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार १५ जानेवारी रोजी सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. मकर संक्रमणाचा क्षण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळात येत असेल, तर पुण्यकाल त्याच दिवशी धरावयाचा व सूर्यास्तानंतर येत असेल, तर पुढचा दिवस संक्रांती म्हणून मानावयाचा अशी पद्धत असल्यामुळे मकर संक्रांत क्वचित एका दिवसाने पुढे जाऊ शकते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा आनंदाचा व उपभोगाचा सण मानला जातो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत या दिवशी असतो. हा सण माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत एकमेकांमधीव स्नेह वाढवतो. भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगळ वा इंद्रपोंगळ, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगळ आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगळ साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानले आहे. त्या दिवशी प्रयाग, गंगासागर इ. ठिकाणी प्रचंड मेळे भरतात.