शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस कामाला लागले! विधान परिषदेवर भाजपचाच सभापती होणार? मविआला पुन्हा धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:26 AM

1 / 9
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) कोसळले. शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार आले. तत्पूर्वी सुरुवातीला राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिल्यानंतर आता भाजपचे पुढील लक्ष्य विधान परिषदेच्या सभापतीपद असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 9
मुख्यमंत्रिपद जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी विधानसभा अध्यक्षपदासह मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवत भाजपने सरकारमधील आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
3 / 9
विधानसभेनंतर विधानपरिषदेतही निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतीपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
4 / 9
राज्यात सत्तांतर घडवल्यानंर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. आता विधिमंडळातील विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली होती. आता विधान परिषदेचे सभापतीपदही आपल्याकडेच असावे असा भाजपचा आग्रह असून भाजपने त्यासाठी हालचालीही सुरु केल्या आहेत.
5 / 9
विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून प्राध्यापक राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचा सभापती व्हावा यासाठी सभापती निवडीपूर्वी राज्यपाल कोट्यातील १२ आमदार नियुक्त व्हावे यासाठी भाजपचा प्रयत्न सुरु आहे. खरंतर राम शिंदे यांचे नाव भाजपच्या प्रदेशाध्यपदासाठीही चर्चेत होते. मात्र पक्षनेतृत्वाने या पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विश्वास टाकला.
6 / 9
त्यामुळे आता सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन भाजपकडून राम शिंदे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापतीपदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता असून आगामी काळात नेमकी काय समीकरणे जुळवली जातात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
7 / 9
विधानपरिषदेत एकूण ७८ सदस्य असतात. सद्यस्थितीत या सभागृहात भाजपकडे २४, तर शिवसेनेकडे ११ आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा आहेत. तसंच १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे.
8 / 9
राज्यात भाजप-शिंदे गटाची सत्ता असल्याने या १२ जागांवर मंत्रिमंडळाने सुचवलेल्या नावांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून लवकरच शिक्कामोर्तब केले जाईल. त्यामुळे भाजपचे संख्याबळ वाढून ३६ वर पोहोचणार आहे. तसेच रासपचा एक आणि एका अपक्ष आमदाराच्या जोरदावर भाजपची एकूण संख्या ३८ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
9 / 9
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आले तरी त्यांची संख्या ३१ इतकीच होते. शेकाप आणि अन्य काही पक्षांनी महाविकास आघाडीला साथ दिली तरी त्यांच्याकडे जास्तीत जास्त ३६ इतके आमदार होऊ शकतात. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे पारडे जड असणार असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकVidhan Parishadविधान परिषदMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा