शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष नसले तर कोणते अधिकार गमावतील? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 1:20 PM

1 / 11
राज्याच्या राजकारणात सर्वात ज्येष्ठ असलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयाने सगळ्यांना बुचकळ्यात टाकले. लोक माझे सांगती या पुस्तक प्रकाशनावेळी पवारांनी निवृत्तीची घोषणा करत थेट अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं म्हटलं.
2 / 11
शरद पवारांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना धक्का बसला, कार्यकर्ते आक्रमक झाले. शरद पवारांनी अनपेक्षितपणे घेतलेला निर्णय कुणालाही न पटणारा होता. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र, उपोषणाला सुरुवात केली.
3 / 11
आता शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्याचे अनेक राजकीय पडसाद येणाऱ्या भविष्यकाळात उमटलेले पाहायला मिळू शकतात. कारण शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याने निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडे होते.
4 / 11
शरद पवारांनी राजीनामा मागे न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन अध्यक्ष निवडावा लागेल. हा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या कार्यकारणी समितीत निवडून येईल. त्यानुसार पक्षाचे पुढील सर्व अधिकार नवीन अध्यक्षांकडे सुपूर्द होतील.
5 / 11
शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नसल्याने त्यांचे अनेक अधिकार आपोआप जातील. त्यात पवार पक्षाचे धोरण अधिकृतपणे ठरवू शकणार नाही. राष्ट्रवादीचे संस्थापक म्हणून ते सल्ला देऊ शकतात परंतु त्याचे पालन करणे पक्षावर बंधनकारक नसेल.
6 / 11
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे धोरण आणि भूमिकेचे सर्वाधिकार हे नव्या पक्ष अध्यक्षांकडे असतील. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णयात शरद पवारांचा केवळ मार्गदर्शक आणि सल्लागार म्हणून भूमिका असेल. कामकाजात आणि निर्णयात ते हस्तक्षेप करू शकणार नाहीत.
7 / 11
गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे अवघ्या ८ महिन्यांनंतर शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला.
8 / 11
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये १० सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यात शरद पवार यांची पुढील पाच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
9 / 11
विविध राज्यांच्या प्रदेश समित्यांनी शरद पवार यांच्याच नावाचे प्रस्ताव अध्यक्षपदासाठी पाठविले होते. यानुसार शरद पवार यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी शरद पवार यांचे नेतृत्व एकमेव पर्याय असल्याचा दावाही त्यावेळी अनेक नेत्यांनी भाषणांमध्ये केला होता.
10 / 11
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी नेते अजित पवारांबाबत विविध वावड्या उठत होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीत २ गट पडतील अशीही चर्चा सुरू झाली होती. तेव्हा शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची वेळ आलीय. लवकरच ती फिरवली जाईल असं सांगत संकेत दिले होते.
11 / 11
शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु खुद्द शरद पवारच राजीनामा देतील याचा विचारही कुणी केला नव्हता. मात्र शरद पवारांनी खेळलेली ही खेळी भविष्यात राष्ट्रवादीला कशी फायदेशीर ठरेल हे दिसणार आहे.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस