शब्दांपेक्षा चित्रांची भाषा प्रभावी ठरते. चित्रकलेतील व्यंगचित्र कला ही व्यक्ती, समाज, राज्य आणि देश यांच्यातील उणीवा, त्रुटींवर मार्मिक भाष्य करते. त्यामुऴेच सजीव लोकप्रतिनिधींसारखी व्यंगचित्रेही समाजाचे प्रतिनिधीत्व करतात किंबहुना सजीव लोकप्रतिनिधीपेक्षाही व्यंगचित्रांमध्ये प्रामाणिकपणा, सचोटी जास्त असते. म्हणूनच व्यंगचित्रे पाहणा-याचे लक्ष खिळवून ठेवतात. सर्वसामान्यांना व्यंगचित्रातून आकाराला आलेला पक्ष म्हणून शिवसेना माहित असेल. पण या व्यंगचित्रांनी त्याही आधीपासून सतराव्या शतकापासून राजसत्तांना हादरे दिल्याची उदहारणे आहेत. फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट, जर्मन हुकूमशह अॅडॉल्फ हिटलर यांनीही या व्यंगचित्रांचा धसका घेतला होता.जेम्स गिलरे“Manic ravings, or Little Boney in a Strong Fit” (1803).जन्म - १३ ऑगस्ट १७५६ - मृत्यू - एक जून १८१५जन्मस्थळ - इंग्लंड, लंडनजेम्स गिलरे या ब्रिटीश व्यंगचित्रकाराने सतराव्या शतकाच्या उतरार्धात आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपवर सत्ता गाजवणार फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्टला त्रस्त करुन सोडले होते. युरोपमधील सर्व लष्करे मिळून माझी सत्ता उलथवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यापेक्षा जेम्स गिलरेची व्यंगचित्रे जास्त प्रभावीपणे काम करतात असे नेपोलियनने म्हटले होते. इंग्लंडमधल्या लंडन येथे १३ ऑगस्ट १७५६ रोजी जेम्स गिलरे यांचा जन्म झाला. गिलरे यांना राजकीय व्यंगचित्रांचे पितामह म्हटले जाते. त्यांनी आधी आपल्या व्यंगचित्रातून ब्रिटनचे राजे जॉर्ज तिसरे यांच्यावर निशाणा साधला. नंतर नेपोलियनला आपल्या व्यंगचित्रांनी हैराण केले. त्यांचा एक जून १८१५ रोजी मृत्यू झाला.लुईस राइमाइकर्स“The German Tango”जन्म - ६ एप्रिल १८६९ - मृत्यू २६ जुलै १९५६जन्मस्थान - हॉलंड, रोइरमॉंडपहिल्या जागतिक महायुद्धाच्यावेळी लुईस राइमाइकर्स सर्वात प्रभावशाली व्यंगचित्रकार होता. त्यावेळी त्यांच्या इतका अधिकारवाणीने भाष्य करु शकणारा दुसरा कोणीही व्यंगचित्रकार नव्हता. जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केल्यानंतर हॉलंडने आपली तटस्थ भूमिका सोडून बेल्जियमला साथ द्यावी अशी त्यांची भूमिका होती. आपल्या व्यंगचित्रातून त्याने ती व्यक्तही केली. हॉलंड सरकारने त्यांची व्यंगचित्रेही जप्त केली होती. जर्मनीने लुईस यांना जिवंत अथवा मृत पकडून देणा-यांना १२ हजार गिल्डरचे इनाम ठेवले होते. यावरुन त्यांच्या प्रभावी व्यंगचित्रांची कल्पना येते. त्यावेळचे त्यांचे गाजलेले जर्मन टँगो हे व्यंगचित्र डेव्हीड लो “Rendezvous”जन्म - सात एप्रिल १८९१ - मृत्यू १९ सप्टेंबर १९६३ जन्मस्थळ - डयुनेडीन पहिल्या जागतिक महायुद्धावर लुईस राइमाइकर्स यांच्या व्यंगचित्रांचा जसा प्रभाव होता तसा दुस-या महायुद्धाच्यावेळी डेव्ही लो यांच्या व्यंगचित्रांचा प्रभाव होता. त्या काळात डेव्हीड लो यांची व्यंगचित्रे प्रकाशित झाल्यानंतर संपूर्ण जर्मन यंत्रणा कामाला लागत असे. त्याकाळी लो यांनी जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर, इटालिचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी आणि रशियन हुकूमशहा जोसेफ स्टालिन यांच्यावर आपल्या व्यंगचित्रातून कडवट टीका केली होती. २० सप्टेंबर १९३९ रोजी इव्हीनिंग स्टँण्डर्ड मध्ये प्रसिद्ध झालेले हिटलर आणि स्टालिन परस्परांना झुकून अभिवादन करतानाचे व्यंगचित्र प्रचंड गाजले होते. दोघांनी एकत्र येऊन पोलंडवर आक्रमण केल्यानंतर लो यांनी आपल्या खास शैलीतून या व्यंगचित्रातून हिटलर आणि स्टालिनवर टीका केली होती. लो यांचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला पण त्यांनी आपले करीयर इंग्लंडमध्ये घडवले. जर्मनीने त्यावेळी लो यांच्या व्यंगचित्रांविरोधात इंग्लंडकडे रीतसर तक्रारी केल्याचीही नोंद आहे. हिटलरच्या नाझी सैन्याने इंग्लंडवर चढाई केल्यानंतर कोणाकोणाला अटक करायची त्याचे 'द ब्लॅक बुक' तयार केले होते. त्यामध्ये लो यांचे सुद्धा नाव होते. बॅरी ब्लिट “The Politics of Fear, जन्म - ३० एप्रिल १९५८ ( वय ५८ वर्ष)जन्मस्थळ - कॅनडा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरील अलीकडच्या काळातील हे वादग्रस्त व्यंगचित्र. बॅरी ब्लिट या अमेरिकन व्यंगचित्रकाराने ओबामांची खिल्ली उडवण्यासाठी हे व्यंगचित्र काढले होते. ओबामा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत असताना न्यूयॉर्कर या नियकालिकाने हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. या व्यंगचित्रात बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांना दहशतवादाच्या वेशात दाखवले होते. त्यांच्या खांद्यावर बंदुका लावलेल्या होत्या. हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर न्यूयॉर्करच्या अनेक वाचकांनी त्यांचा अंक रद्द केला होता. ओबामांनीही त्यावेळी प्रचाराच्या त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून न्यूयॉर्करची ही कृती अपमानास्पद असल्याचे सांगून निषेध केला होता. जोनाथन शापिरो जन्म - २७ ऑक्टोंबर १९५८ ( वय ५७)जन्मस्थळ - केप टाऊन, दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार जोनाथन शापिरो यांनी वरील व्यंगचित्रातून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकॉब झुमा यांच्या जुलमी कारभारावर भाष्य केले होते. त्यावेळी झुमा यांच्यावर बलात्कार आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. सात डिसेंबर २००८ रोजी 'द संडे टाईम्स'मध्ये हे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. यात झुमांच्या सहका-यांनी एका महिलेला पकडले असून, झुमांना त्यांचे सहकारी बलात्कारासाठी बोलवत आहेत असे दाखवण्यात आले होते. व्यंगचित्रातून बदनामी केली म्हणून झूमा यांनी टाईम्स मिडीया ग्रुपविरोधात ५० लाख रँडचा नुकसान भरपाईचा खटला दाखल केला होता. व्यंगचित्र साप्ताहिक 'चार्ली हेब्दो'वर हल्ला 'चार्ली हेब्दो' हे खास व्यंगचित्रांसाठी ओळखले जाणारे फ्रेंच साप्ताहिक. या साप्ताहिकाच्या कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चार्ली हेब्दो चर्चेत आले. महम्मद पैंगबरांची वादग्रस्त व्यंगचित्रे प्रसिद्ध केली म्हणून दहशतवाद्यांनी चार्ली हेब्दोवर दोनवेळा हल्ला केला. आपण पंथ, धर्म या पलीकडे जाऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो असे चार्ली हेब्दोचा दावा आहे. २०११ मध्ये चार्ली हेब्दोवर पहिला हल्ला झाला. २०१५ मध्ये दुस-या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी कार्यालयात घुसून अंदाधुंद गोळीबार केला त्यात १२ जण ठार झाले. काही व्यंगचित्रकारांचाही यामध्ये मृत्यू झाला.