ऑनलाइन लोकमत - मुंबई, दि. 08 - राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार झाला असून नवीन 10 चेह-यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 11 जणांचा शपथविधी पार पडला. भाजपाचे सात, शिवसेनेचे दोन आणि मित्रपक्षांचे दोन अशा 11 जणांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. 6 जणांना कॅबिनेट तर 5 जणांना राज्यमंत्री देण्यात आलं आहे. महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली असून राम शिंदे यांनादेखील प्रमोशन देत कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. यांच्यासोबतच संभाजीराव निलंगेकर, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, पांडुरंग फुंडकर यांनीदेखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या अर्जून खोतकर, गुलाबराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि भाजपाचे रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. कोण आहेत हे 10 नवे चेहरे ? जाणून घेऊया 1) जयकुमार रावळ - भाजपाइंग्लडमधील कार्डिफ विद्यापीठातून ‘एमबीए’ची पदवी घेणारे जयकुमार रावळ भाजपच्या तिकिटावर शहादा-दोंडाईचा येथून 2004 ला पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले, तर 2009 आणि 2014 साली शिंदखेडा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले. विविध उद्योग, अनेक महाविद्यालये यांच्या नावावर आहेत. तसंच अनेक गुन्ह्यातही रावल यांचं नाव आहे. 2) भाऊसाहेब फुंडकर - भाजपाभाऊसाहेब फुंडकर यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची पाळेमुळे बळकट केली आहे. जनसंघ ते भाजपा असा त्यांचा प्रवास असून, आणीबाणीनंतर खर्या अर्थाने भाऊसाहेबांनी आपल्या तळागाळातील सहकार्यांच्या साथीने पक्ष बळकट केला. १९७१ च्या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. १९७२ ला नागपूर विद्यापीठात खामगावातून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून भाऊसाहेबांची सर्वप्रथम निवड झाली . ही त्यांची पहिली निवडणूक होती. आणीबाणीत कारावास भोगल्यानंतर खामगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. तत्कालीन संघटन मंत्री वसंतराव भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस प्रश्नावर 'खामगाव ते आमगाव' अशी पदयात्रा काढली. त्यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात होता. खुद्द इंदिरा गांधींचा पराभव होऊनसुद्धा अकोल्यातून वसंतराव साठे काँग्रेसवर विजयी झाले होते. असा हा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळविण्याचे श्रेय भाऊसाहेब फुंडकरांनाच जाते. सलग तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघ त्यांनी भाजपच्या ताब्यात ठेवला. त्यानंतर सातत्याने विधान परिषदेत पक्षाचा व शेतकरी, शेतमजुरांचा आवाज बुलंद केला. पक्षानेही भाऊसाहेबांवर वेळोवेळी मोठी जबाबदारी टाकली. त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदही यशस्वीपणे सांभाळले. तसेच पणन महासंघाचे अध्यक्षपद भूषविले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील भाऊसाहेबांनी सभागृहात आपला ठसा उमटविला. असा दीर्घ अनुभव पाठीशी असलेल्या भाऊसाहेबांना अखेर मंत्रिपद मिळाले. 3) सुभाष सुरेशचंद्र देशमुख - भाजपाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे सुभाष सुरेशचंद्र देशमुख. स्वच्छ प्रतिमा आणि मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. 1998 साली विधान परिषद सदस्य होते. 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्वला शिंदे विरोधात लोकसभा निवडणुकीत 6 हजार मतांनी विजयी होऊन त्यांनी बाजी मारली होती. 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवून 3 लाख मते मिळवली होती. 4) मदन येरावार - भाजपानितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असणारे मदन येरावार भाजपाचे यवतमाळचे आमदार आहेत. 1996 आणि 2004 साली देखील यवतमाळ विधानक्षेत्रातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. 5) संभाजीराव निलंगेकर - भाजपा पहिल्याच निवडणुकीत आजोबा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटलांचा पराभव करणारे संभाजीराव निलंगेकर तीन वेळा आमदार म्हणुन निवडुन आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे यांचे निकटवर्तीय म्हणुन ओळख आहे. मुंडे विरोधी आणि गडकरी गटाच्या जवळचे म्हणुनदेखील ओळखले जातात. एक तरुण संघर्षशील व बहुजन नेतृत्व, नम्र मनमिळावू स्वभाव, भाऊक वृत्ती, अन्यायाविरुध्द आक्रमक होणारे व्यक्तिमत्व, साधी राहणी, निष्कलंक चारित्र्य आणि डाळ-भाकरीत आवडीने रमणारा नेता म्हणून संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे पाहिले जाते.नाविण्यपूर्ण उपक्रम सामुहिक विवाह सोहळ्य़ाचे आयोजन, आरोग्य शिबीर, युवकांसाठी करिअर शिबीर, शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतक-यांत जागृती करण्यासाठी किर्तनकार व समाजप्रबोधनकार यांचा विशेष मेळावा, मतदारसंघात टंचाई काळात गावचा कृती आराखडा तयार करण्यासाठी एकाच दिवशी ग्रामसभेचे आयोजन, युवकातील खिलाडूवृत्ती वाढविण्यासाठी विशेष क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले.राजकीय संघर्ष..सर्वसामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दिलीपराव पाटील निलंगेकर यांचा 28 नोव्हेंबर 1999 रोजी आकस्मात मृत्यू झाला. संभाजीराव पाटील हे ज्येष्ठ असल्याने, त्यांनी वैमानिकपदाची नोकरी सोडली. सामाजिक संस्काराचे धडे देणा-या मातोश्री रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कामाला सुरुवात केली. अंबुलगा बु. येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 2001 साली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेस विरोधी विचारांची मोट बांधून निलंगा ग्रामीण विकास आघाडीची स्थापना केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करुन, पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली अन पहिल्यांदाच काँग्रेसला सुरुंग लावला. 6) रवींद्र चव्हाण - भाजपाकाही दिवसांपूर्वीच जातीवाचक वक्तव्य केल्याने अडचणीत आलेले भाजपचे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण 2005 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विराजमान झाले होते. 2009 साली भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवड. 7) महादेव जानकर - राष्ट्रीय समाज पक्षमहादेव जानकर यांनी २००३ साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. जानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा अशा राज्यात अनेक निवडणुका लढवतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. जानकर यांना एकूण ४५१,८४३ मते प्राप्त झाली. सुळे यांना ४८.८८ % मते प्राप्त झाली तर जानकर यांना ४२.३५ % मते मिळाली. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन अनेक आंदोलनं केली आहेत. 8) सदाभाऊ खोत - स्वाभिमानी शेतकरी संघटनाशेतकरी नेता म्हणून ओळख असणारे सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली आहे. ऊस, सोयाबीन, कापूस, भात यांच्या दरासाठी वेळोवेळी पदयात्रा आणि आंदोलने करत त्यांनी सरकारविरोधात आवाज उठवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा असलेले सदाभाऊ खोत यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत समावेश केला. 9) अर्जून खोतकर - शिवसेनाधार्मिक कार्यात प्रामुख्याने सहभाग व आवड, शालेय जीवनापासून नेतृत्व केले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी संसद सचिव म्हणून कार्य केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख म्हणून नेतृत्व केले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सतत आंदोलने करुन न्याय मिळवून दिला. शिवसेना जिल्हा उपप्रमुख म्हणूनही काम केले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्यांदा शिवसेनाकडून मार्च 1990 मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळविली व जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून निवड झाली. सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून नावलौकिक मिळविला. मार्च 1995 मध्ये दुस-यांदा बहुमताने विधानसभेवर निवड झाली. या कालावधीमध्ये राज्य शासनाच्या पंचायतराज कमिटी, रोजगार हमी योजना या कमिटय़ांचे सदस्य म्हणून कामकाज पाहिले. तसेच युती शासन असताना सुरुवातीस पक्षाचे प्रतोद पदी नेमणूक झाली.जिल्ह्यातील सहकार क्षेत्रतील अग्रगण्य बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. या बँकेचे अध्यक्ष, चेअरमन म्हणूनही काम केले. या बँकेद्वारे 1998 मध्ये राज्य सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाली. दरम्यानच्या काळात जालना सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवड झाली. जालना जिल्हा सहकारी देखरेख संघाचे अध्यक्ष म्हणून कामकाज केले. 17 मार्च 1997 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. वस्त्रोद्योग व पर्यटन खात्याचा कार्यभार देण्यात आला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात पुन्हा राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता तसेच माहिती व जनसंपर्क खात्या कारभार त्यांनी यशस्वीपणो सांभाळला. सन 2002-03 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दुस:यांदा संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली. सन 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत 16 हजार 5क्क् मतांनी विजय मिळविला. या काळात महाराष्ट्र शासनाच्या अंदाज समिती सदस्य व मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये शासन नियुक्त सदस्य म्हणून कामकाज पाहिले. 2007 मध्ये जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्व पॅनलचा मताधिक्याने विजय झाला. सभापतीपदी बिनविरोध नवड झाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जालना विधानसभा मतदार संघामध्ये चौथ्यांदा विजय मिळविला असून शासनाच्या विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख म्हणून निवड झाली. 7 जून 2016 रोजी पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी बिनविरोध फेरनिवड झाली. 10) गुलाबराव पाटील - शिवसेना शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रातील चेहरा म्हणून ओळख असणारे गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक आहेत. शिवसेनेशी सुरुवातीपासूनच एकनिष्ठ आहेत. तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून गेले