शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली होती भेट; आज भाजपानं आमदार बनवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 2:23 PM

1 / 10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं मोठा राजकीय डाव खेळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा आणि संस्कृती दाखवणारं ५ मजली नंगारा वस्तूसंग्रहालयाचं अनावरण केले होते. त्यावेळी त्यांनी बंजारा समाजातील प्रमुख संतांची भेट घेतली होती.
2 / 10
या धर्मगुरू आणि संतांची भेट घेत पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केले होते. आता महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये बंजारा समाजातील सर्वात मोठे श्रद्धाकेंद्र असलेल्या पोहरादेवी शक्तीपीठाचे प्रमुख धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.
3 / 10
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे प्रमुख तीर्थस्थळ आहे. याठिकाणी जगद्गुरु संत सेवालाल महाराज आणि जगदंबा मातेचं मंदिर आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी बंजारा समाजासाठी काशी म्हणून ओळखले जाते. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते, कृषी क्रांती जनक वसंतराव नाईक आणि जलसंरक्षण जनक सुधाकरराव नाईक यांनीही दौरा केला होता.
4 / 10
पोहरादेवी इथं संत रामराव महाराजांची समाधी आहे. त्यांच्यानंतर पोहरादेवी शक्तीपीठाचे उत्तराधिकारी म्हणून महंत धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांची निवड करण्यात आली. नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यात आले होते, तेव्हा त्यांनी बाबुसिंग महाराज राठोड यांच्यासह इतर संतांची भेट घेतली होती.
5 / 10
आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बाबूसिंग महाराज राठोड यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली. त्यापूर्वी ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून माझं नाव जाहीर केले. माझी विधान परिषदेवर नियुक्तीसाठी निरोप पाठवला, माझी निवड केल्याबद्दल सर्व बंजारा समाज महायुती सरकारचे ऋणी आहे असं त्यांनी सांगितले.
6 / 10
त्याशिवाय माझ्या नियुक्तीमुळे डॉ. रामराव महाराजांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झालं. आमच्या बंजारा समाजाला न्याय मिळवण्यासाठी मला राज्यपाल आणि महायुती सरकारने हे पद दिले. मी या आमदारकीच्या माध्यमातून बंजारा समाजासाठी मनोभावे सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया महंत बाबूसिंग महाराज राठोड यांनी दिली.
7 / 10
बंजारा समाजाची मते लक्षात घेता भाजपाने धर्मगुरू महंत बाबुसिंग महाराज राठोड यांची विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात वाशिमसह विदर्भात भाजपाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. बाबूसिंग महाराज राठोड यांना विधान परिषदेवर पाठवून भाजपाने बंजारा समाजाला संदेश दिला आहे.
8 / 10
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सोमवारी ७ जणांची नियुक्ती करण्यात आली. एकूण १२ सदस्य नियुक्त करण्याची अपेक्षा होती मात्र ५ जागा रिक्त ठेवून उर्वरित जागा भरण्यात आल्या. त्यात भाजपाला ३, शिंदेसेना २ आणि अजित पवार गटाला २ जागा देण्यात आल्या आहेत.
9 / 10
राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी सकाळी झालेल्या बैठकीत या ७ नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लगोलग तसा प्रस्ताव देखील राज्यपालांकडे पाठवण्यात आला. राज्यपालांनी सायंकाळी या यादीला मंजुरी दिली आणि राजभवनाकडून राज्य सरकारला तसा निरोप कळवण्यात आला.
10 / 10
विधान परिषदेच्या या ७ जागांमध्ये भाजपाकडून बाबूसिंग महाराज राठोड यांच्यासह चित्रा वाघ, विक्रांत पाटील तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मनीषा कायंदे, हेमंत पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इंद्रीस नायकवडी यांना विधान परिषदेची आमदारकी दिली आहे.
टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४