शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आपले प्रश्न घेऊन लोक राज ठाकरेंकडे का जाताहेत?... जाणून घ्या 'राज की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 8:32 PM

1 / 13
महाराष्ट्र न वनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या 'संकटमोचक' म्हणून चर्चेत आहेत. तसं तर, त्यांच्याकडे आपले प्रश्न, समस्या घेऊन एरवीही वेगवेगळ्या स्तरांतील लोक जातच असतात. त्यापैकी काही प्रश्न मार्गीही लागतात. पण सध्या 'कृष्णकुंज'ची ओळख 'हमखास यशाची खात्री' अशी टॅगलाईन असलेल्या कोचिंग क्लाससारखी झालीय आणि हा 'राजदरबार' पाहून मनसैनिकांना पक्षाच्या 'नवनिर्माणा'ची खात्रीही वाटू लागली आहे.
2 / 13
गेल्या काही दिवसांत जिमचे चालक-मालक, मुंबईचे डबेवाले, मूर्तिकार, खासगी डॉक्टरांचं शिष्टमंडळ, महाराष्ट्रातील देवस्थानांची प्रमुख मंडळी, ग्रंथालयांचे विश्वस्त, कोळी महिला यांनी 'कृष्णकुंज'वर हजेरी लावली, आपली गाऱ्हाणी मांडली.
3 / 13
इतकंच नव्हे तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव, राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील नागरिकही आपले प्रश्न घेऊन 'मातोश्री'ऐवजी 'कृष्णकुंज'वर पोहोचले होते.
4 / 13
राज ठाकरे यांनी या नागरिकांचं, शिष्टमंडळांचं म्हणणं ऐकून घेतलं. काहींना मदतीची ग्वाही दिली, तर काही विषयांबाबत थेट ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना फोन केला किंवा पत्र पाठवलं.
5 / 13
लॉकडाऊनमुळे हवालदिल झालेल्या, पिचलेल्या या समूहांना 'मी पाठिशी आहे', हे राज ठाकरेंचे शब्द आश्वासक वाटले. काहींची कामं मार्गी लागल्यानं राज ठाकरेंचा करिष्माही दिसला. त्याची चर्चा झाली अन् 'कृष्णकुंज'कडे ओघ वाढला.
6 / 13
वास्तविक, भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तीन सत्ताधारी पक्षांच्या वैयक्तिक आमदारांच्या संख्येपेक्षा जास्त आमदार भाजपाचे आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही अनेक विषय जोमाने मांडत आहेत. प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासारखे आक्रमक नेतेही त्यांच्याकडे आहेत. मग असं असतानाही, मुंबईतील नागरिक आपल्या समस्या घेऊन, केवळ एकमेव आमदार असलेल्या (तोही मुंबईतील नव्हे) राज ठाकरेंकडे का जात असावेत, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एक वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली. या 'राजकारणा'मागे बरीच पुढची गणितं दडलेली आहेत.
7 / 13
राज ठाकरे आणि त्यांच्या मनसैनिकांची काम करण्याची पद्धत तर सगळ्यांना माहीत आहेच. हीच पद्धत काही वर्षांपूर्वी 'मातोश्री'ची, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची होती. त्यामुळे 'कृष्णकुंज' 'प्रतिमातोश्री' झाल्याचं अनेक जण म्हणताहेत.
8 / 13
सत्तेत असलेल्या पक्षांना काही नियम, निर्बंध, आचारसंहिता पाळावी लागते. स्वाभाविकच, सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांचे हातही बांधले जातात. लोक त्यांचे प्रश्न घेऊन आले तरी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात कसं बोलणार, हा प्रश्न असतो. तशी अडचण विरोधी पक्षाला नसते आणि तीही राज ठाकरेंसाठी जमेची बाजू ठरतेय. पटत नसलेल्या मुद्द्यांवर ते ठामपणे भूमिका मांडू शकत आहेत, जनतेसाठी भांडू शकत आहेत.
9 / 13
पण, याही पलीकडे एक कुजबूज ऐकायला मिळतेय. ती म्हणजे, भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच मनसेला बळ देत नसावी कशावरून? ही चर्चा अगदीच निराधार नाही. कारण, राज ठाकरेंनी मागणी केली अन् दोन दिवसांत सरकारने निर्णय घेतला, असं एकदा नव्हे, दोन-तीन वेळा घडलंय.
10 / 13
मुंबईचे डबेवाले राज ठाकरेंना भेटले आणि लगेचच त्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली. जिमच्या बाबतीतही तसंच घडलं होतं आणि आता आजच राज ठाकरेंच्या पुढाकारानंतर ग्रंथालयांची दारंही सरकारनं उघडली आहेत.
11 / 13
मागे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर, भाजपा - मनसे युतीची चर्चा झाली होती. तसं काही झाल्यास महापालिका निवडणुकांमध्ये मतांचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे, मनसेची 'बार्गेनिंग पॉवर' वाढवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीच त्यांना 'पॉवर' देतेय का, या शंकेलाही वाव आहेच. मनसे आणि भाजपाचं गणित जुळू न देण्याची ही खेळी असू शकते.
12 / 13
'ठाकरे ब्रँड' हा विषयही काही दिवसांपूर्वी चर्चेत आला (आणला) होता. राज-उद्धव यांच्यातील दुरावा, कटुता आता बरीच कमी झाली आहे. त्यामुळे भाजपाची चर्चा अन् विस्तार होण्यापेक्षा राज ठाकरेंचं राजकीय वजन वाढलं, तरी शिवसेनेसाठी ते सोयीस्कर आहे.
13 / 13
अर्थात, सध्या 'कृष्णकुंज'वर सुरू असलेल्या 'सरकारराज'चा फायदा मनसे निवडणुकीत कसा करतं, यावर बरंच काही अवलंबून आहे. तुम्ही सत्ता त्यांना देता आणि प्रश्न घेऊन माझ्याकडे येता, असा चिमटा राज ठाकरेंनी डबेवाल्यांना काढला होता. पण, असं का होतं, याचं आत्मपरीक्षण मनसेनंही करायला हवंय.
टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी