शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 2:28 PM

1 / 6
ईव्हीएमवरील मतदानाची आकडेवारी तसेच मतदान झाल्यानंतर पॉलिटिकल बूथ एजंट समक्ष डायरीत लिहिलेली आकडेवारी यात तफावत आढळल्याने शहर मध्य, दक्षिण सोलापूर, करमाळा तसेच माढा विधानसभा मतदारसंघातील संबंधित मतदान केंद्राध्यक्षांची चौकशी करणार आहे. एक व दोन मतांची तफावत जाणवत असून ही मानवी चूक आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला कळविले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
2 / 6
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात दोन मतांची तफावत जाणवत आहे. बेरिया हॉल येथील बूथ क्रमांक १९७ येथे ईव्हीएमवर ६६५ इतके मतदान झाले. मतदान डायरीत ६६३ मतदानाची नोंद आढळली. समान नावे असलेल्या दोन मतदारांनी टेंडर वोट केले. टेंडर वोटची नोंद स्वतंत्रपणे करून ६६३ प्लस २ असे एकूण ६६५ करणे गरजेचे होते. संबंधित मतदान केंद्राध्यक्षाने डायरीत ६६३ अशी नोंद केली.
3 / 6
मतमोजणी दरम्यान ही चूक लक्षात आली. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात ईडीसीची नोंद डायरीत घेतली नव्हती. इलेक्शन ड्यूटीवर असलेल्या एका कर्मचाऱ्याने फॉर्म १७ सी अर्ज भरून ईव्हीएमवर मतदान केले. डायरीत नोंद नसल्याने या ठिकाणी एक मताची तफावत आढळली.
4 / 6
करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक ११५ या ठिकाणी ईव्हीएमवर ८३८ मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी केंद्राध्यक्षांनी ८३६ इतके मतदान झाल्याची नोंद केली.
5 / 6
माढा विधानसभा मतदारसंघातील उपळाई खुर्द येथील बूथ क्रमांक १४९ या ठिकाणी मॉक पॉलचे रिझल्ट डिलीट न केल्याने संबंधित बूथची मतमोजणी बाजूला ठेवण्यात आली. या ठिकाणी ६७० इतके मतदान झाले. या मतदारसंघात विजयी उमेदवाराचे मताधिक्य जास्त असल्याने संबंधित बूथवरील मतमोजणी करण्याची वेळ आली नाही. मताधिक्य ६७० पेक्षा कमी असले असते तर संबंधित बूथवरील ईव्हीएम मशीनची मोजणी करावी लागली असती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
6 / 6
या किरकोळ मानवी चुका वगळता संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली. ज्यांच्याकडून चुका झाल्या त्यांची चौकशी होईल. दोन दिवसात तसे आदेश देणार आहे. या संबंधी निवडणूक आयोगाला माहिती पाठवली आहे. कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर
टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024SolapurसोलापूरVotingमतदानmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४