शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शिवसेनेसोबत पुन्हा मैत्री करणार?; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 4:02 PM

1 / 10
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात २५ वर्षापूर्वी मैत्री झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजपा नेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे युतीचे शिल्पकार होते. अटलबिहारी वाजपेयी-बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेना-भाजपानं एकमेकांची साथ सोडली नाही.
2 / 10
परंतु राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींसारखा प्रबळ चेहरा भाजपाला मिळाला. मोदींच्या जीवावर भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवली. २०१४ मध्ये शिवसेना-भाजपा युती तुटली आणि पहिल्यांदाच भाजपानं राज्यात एकट्याच्या बळावर १२२ जागांपर्यंत मजल मारली.
3 / 10
त्यानंतर राज्यात मोठा भाऊ कोण? असा प्रश्न निर्माण झाला. २०१४ च्या निकालानंतर शिवसेना काही काळ विरोधी बाकांवर बसली त्यानंतर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा एकत्र आले. राज्यात शिवसेना सत्तेतील वाटेकरी बनली.
4 / 10
२०१४ ते २०१९ या कालावधीत शिवसेनेने अनेकदा सत्तेत राहूनही भाजपाविरोधी भूमिका घेतली होती. परंतु राजकीय अपरिर्हता म्हणून दोन्ही पक्षांनी एकमेकांसोबत नातं तोडलं नव्हतं. २०१९ लोकसभा निवडणुकीत पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीची पायरी चढली.
5 / 10
२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपाने एकत्र लढवल्या. शिवसेनेने १८ खासदार निवडून गेले. केंद्रात शिवसेनेला एक केंद्रीय मंत्रिपद मिळालं. राज्यातही शिवसेना-भाजपा युतीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळालं.
6 / 10
परंतु निकालानंतर मोठी राजकीय घडामोड घडली. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाशी युती तोडत थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची स्थापना केली. ५६ जागांच्या बळावर शिवसेनेने राज्यात मुख्यमंत्रिपद पटकावलं तर काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेची लॉटरी लागली.
7 / 10
राज्यात ऐतिहासिक युती झाली. त्यामुळे भाजपा-शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाला. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असं भाजपा नेते म्हणतात तर भाजपानं दिलेला शब्द पाळला नाही. विश्वासघात केला असा आरोप शिवसेनेचे नेते जाहीर करतात.
8 / 10
परंतु आता महाविकास आघाडीला २ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा मैत्री होईल असं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळेल आणि शिवसेना-भाजपा राज्यात सत्तेत येईल असंही सांगितलं जातं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
9 / 10
शिवसेना-भाजपा यांच्यात मैत्री होईल का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, जनतेने आम्हाला निवडून दिले. आम्ही मोदींच्या नावाने मतं मागितली. शिवसेनेने मोदींच्या नावाने मतं मागितली. आम्हाला लोकांनी निवडून दिले. पण अनैसर्गिक युती करुन सरकार स्थापन केले. जे अनैसर्गिक आहे ते फार काळ टीकत नाही. राजकारणात कधीही डेडलाईन नसते. योग्य दिवसाची वाट पाहा.
10 / 10
त्याचसोबत राजकारणात कुणीही मित्र होऊ शकतं पण सध्या शिवसेनेसोबत मैत्रित्वाची परिस्थिती नाही. वैयक्तिक मैत्री आहे पण पक्ष म्हणून नाही. हिंदुत्व हा आमच्यातील धागा होता पण ते शिवसेनेने सोडून दिले. आता जनाब बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं उर्दू कॅलेंडर लागत असतील. अजान स्पर्धेचं आयोजन केले जात आहे. त्रिपुरात न घडलेल्या घटनेवर अमरावती जे हिंसाचार झाला. त्यात हिंदुत्व नेत्यांवर कारवाई केली त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे असा आरोप फडणवीसांनी केला.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा