शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Maharashtra Political Crisis: शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय? खासदाराच्या बॅनरवरुन चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 4:12 PM

1 / 9
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. दुसरीकडे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही.
2 / 9
दुसरीकडे शिंदे गटाला पाठिंबा वाढत असल्याचे दिसत आहे. केवळ शिवसेना नाही, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिंदे गटाची वाटचाल भाजपमध्ये विलीन होण्याकडे चालली आहे का, असा प्रश्न शिंदे गटात सामील झालेल्या एका खासदाराच्या बॅनरमुळे निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
3 / 9
राज्यातील सत्तानाट्यानंतर वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील होणे पसंत केले. त्यानंतर आता शक्तिप्रदर्शन करण्यासाठी खासदार गवळी यांनी वाशिममध्ये २३ ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र, या मेळाव्याच्या प्रचारासाठी शहरात लावलेल्या बॅनर्सवर शिवसेनेचे कमी अन् भाजपच्या नेत्यांचेच फोटो जास्त झळकल्याने शिंदे गट भाजपच्या वाटेवर आहे का? अशी चर्चा चांगलीच रंगली आहे.
4 / 9
भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याची भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रर केल्यानंतर ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून खासदार गवळी मतदारसंघातच आल्या नव्हत्या. भाजपने त्या हरवल्याची तक्रार करत यवतमाळमध्ये आंदोलनही केले होते. आता तब्बल वर्षभरानंतर त्या मतदारसंघात आल्या आहेत.
5 / 9
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बुलढाण्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील, त्यांच्याकडे कुणीही शिल्लक राहणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचाही संदर्भ वाशिममधील घडामोडींशी जोडला जात आहे.
6 / 9
वाशिममध्ये होऊ घातलेल्या शिंदे गटाच्या या मेळाव्याला भाजपचे नेते प्रवीण दरेकर, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शहाजी बापू पाटील हे प्रमुख मार्गदर्शक असतील, तर वाशिमचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार निलय नाईक, माजी आमदार विजयराव जाधव, भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची उपस्थिती असणार आहे.
7 / 9
या सर्वांचे फोटो बॅनरवर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर भावना गवळी वगळता वाशिम जिल्ह्यातील एकाही शिवसेना पदाधिकाऱ्यांचा फोटो नाही. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात असून, चर्चांना चांगलाच ऊत आल्याचे बोलले जात आहे.
8 / 9
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पाटणी आणि खासदार भावना गवळी यांचा गेल्या अनेक वर्षांतील राजकीय वाद जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. मागील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांविरूद्ध पोलिसात तक्रारी दिल्या होत्या. तर गवळींनी कशी शिवीगाळ केली याचा एक व्हिडिओही भाजपकडून प्रसारित करण्यात आला होता.
9 / 9
गवळी यांनी माफी न मागितल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असा इशारा पाटणी यांनी दिला होता. त्यानंतर अनेक दिवस जिल्ह्यात तणाव होता. भाजप-शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता त्याच पाटणी यांचा फोटो बॅनरवर प्रमुख उपस्थिती म्हणून झळकत असल्याने या दोघांचा वाद मिटला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBhavna Gavliभावना गवळी