शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विधानसभेपूर्वी उलथापालथ होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?; ४ कारणांमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 4:45 PM

1 / 7
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. पुढील महिनाभरात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
2 / 7
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने मागील वर्षी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन मित्रांपक्षांच्या साथीने लढवली. मात्र या निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
3 / 7
विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या चर्चेला बळ देणारी काही कारणेही समोर येत आहेत.
4 / 7
१. लोकसभा निवडणुकीचा निकाल : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी अवघ्या १७ जागांवर सत्ताधारी महायुतीला यश मिळालं. त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा जिंकता आली. शरद पवारांपासून वेगळं होऊन लढलेल्या पहिल्याच निवडणुकीत अजित पवारांना मोठा राजकीय धक्का बसला. अजित पवारांनी महायुतीसोबत गेलेलं त्यांच्या पारंपरिक मतदारांना आवडलं नसल्याचंच या निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी अजित पवार आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात.
5 / 7
२. शिंदेंच्या शिवसेनेसोबतचा संघर्ष : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही नेते मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्यावर थेट हल्ला चढवत आहेत. मंत्री तानाजी सावंत आणि गुलाबराव पाटील यांनी जाहीर व्यासपीठांवरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सगळं काही ठीक नसल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे गेल्यास दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांचा काम करणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
6 / 7
३. सहानुभूतीच्या लाटेला थोपवणं : अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने वयोवृद्ध शरद पवारांबाबत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहानुभूतीची लाट तयार झाल्याचं निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात. लोकसभा निवडणूक निकालातही याचे प्रतिबिंब पाहायला मिळालं होतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबत काडीमोड घेऊन ही सहानुभूतीची लाट कमी करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जाऊ शकतो.
7 / 7
४. जागावाटपाचा तिढा : महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिढा निर्माण झाला असून बंडखोरीचे प्रमाणही वाढण्याची भीती आहे. त्यामुळे समाधानकारक जागा वाट्याला न आल्यास अजित पवारांकडून वेगळी वाट निवडण्याचा निर्णय होऊ शकतो.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४