शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार?; एकनाथ शिंदेंनी रोखठोक सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 1:41 PM

1 / 10
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा यांच्यात बिनसलं, अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपाशी युती तोडत कट्टरविरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. राज्यात महाविकास आघाडी बनली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला.
2 / 10
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून राज्यातील राजकारणाला २०१९ मध्ये वेगळेच वळण मिळाले. एकेकाळी एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र आले. मविआ सरकार बनवत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याचा फटका देवेंद्र फडणवीसांना झाला.
3 / 10
४ महिन्यापूर्वी राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पुन्हा फेरबदल झाला. सत्तेत असणारे मंत्री आणि आमदारांचा असंतोष उफाळून आला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ५० आमदारांनी बंड करत मविआचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे राज्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले.
4 / 10
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार बनवण्याचा प्रस्ताव आणला. मात्र यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून भाजपाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नाही तर ज्या देवेंद्र फडणवीसांना CM पदाचा चेहरा समोर करत निवडणुका जिंकल्या. त्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले.
5 / 10
राज्यातील राजकीय गणितात एकनाथ शिंदेंनी बाजी मारली. भाजपाचे १०६ आमदार असूनही त्यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. तर राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली.
6 / 10
आता २०२४ च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपा-शिंदे गट एकत्रित निवडणुका लढणार हे वारंवार दोन्ही पक्षाचे नेते सांगत आहेत. परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच प्रोजेक्ट करणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
7 / 10
इंडिया टूडेच्या कार्यक्रमात हाच प्रश्न थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हालाच मुख्यमंत्री बनवलं जाणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट उत्तर देणं टाळलं.
8 / 10
एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री बनवणं हे जनतेचं काम असतं. जनतेला वाटेल तो मुख्यमंत्री बनेल. मला फक्त विकास करायचा आहे. लोकांसाठी कल्याणकारी योजना आणायच्या आहेत. चांगले काम करणे हेच आमचं काम आहे. बाकी सर्व जनतेच्या हातात आहे असं सांगत शिंदे यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
9 / 10
राज्यात सध्या भाजपा-शिंदे गटाचं सरकार आहे. परंतु भाजपाच्या पाठिंब्यामुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आहेत. मात्र अनेक भाजपा नेत्यांना आजही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असावेत असं वाटतं. मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं असं भाजपा नेत्यांनी जाहीर वक्तव्य केली होती.
10 / 10
इतकेच नाही तर विरोधकही देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी ते सूपर सीएम आहेत अशी टीका करतात. एकनाथ शिंदे यांना केवळ नावापुरतं मुख्यमंत्री बनवलं असून अनेक कामे, निर्णय देवेंद्र फडणवीसांनाच विचारून घेतले जातात असा आरोपही विरोधक करतात. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री कोण बनणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री