शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरद पवार पुन्हा धमाका करणार; घाटगेंनंतर काही दिवसांतच महायुतीतील हे ३ नेतेही हाती तुतारी घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 2:19 PM

1 / 8
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाने आत्मविश्वास दुणावल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोघेही पायाला भिंगरी लावून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
2 / 8
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
3 / 8
कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते समरजीतसिंह घाटगे हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
4 / 8
जयंत पाटील यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून घाटगे समर्थकांना मार्गदर्शन केलं आणि पक्षप्रवेशासाठी ३ सप्टेंबर रोजीचा मुहूर्तही जाहीर केला.
5 / 8
समरजीत घाटगे यांच्यानंतर महायुतीतील आणखी काही नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं दिसत असून आज जयंत पाटील यांनी वाई मतदारसंघातील भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली आहे.
6 / 8
वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असल्याने या मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मदन भोसले यांना तुतारी चिन्हावर लढवण्यासाठी शरद पवार आणि जयंत पाटलांकडून प्रयत्न सुरू असून भोसले यांचा लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
7 / 8
एकीकडे, मदन भोसले आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चा रंगत असतानाच आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नर मतदारसंघातील आमदार अतुल बेनके यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली आहे. तसंच पवार यांच्या जुन्नर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेनके यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनरही लावले होते. त्यामुळे बेनके हेदेखील अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
8 / 8
इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी पक्षफुटीनंतर अजित पवारांची साथ दिल्यानंतर इंदापूरमध्ये शरद पवार हे नवीन उमेदवाराच्या शोधात आहे. अशातच महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता असल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील वेगळा राजकीय विचार करू शकतात. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील हेदेखील तुतारी हाती घेणार का, हे पाहणं आगामी काळात औत्सुक्याचं ठरणार आहे.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील