मनोज गडनीस(लेखक लोकमत समूहात विशेष प्रतिनिधी आहेत.) इंडियन प्रीमियर लीग’ नामक क्रिकेट प्रकारात खेळाचे गणित ‘हारणे’ अथवा ‘जिंकणे’ एवढय़ा साध्या सोयीचे नसते, तर त्याच्याही पलीकडचे म्हणजे ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणुकीवरील परतावा याचे असते. यात जो जिंकला तोच खरा बाजीगर! आयपीएलच्या गेल्या काही वर्षाचा मागोवा घेतला, तर व्यावसायिक गणिताच्या या धावपट्टीवर आयपीएल फ्रॅन्चायझीच्या दिग्गज मालकांना ‘चक दे’ म्हणत आज शाहरुख खानने बाजी मारली आहे. इतर कंपन्यांच्या ताळेबंदावरील तोटय़ाच्या लाल रेघा वाढत असताना, शाहरुखच्या कोलकाता नाइट रायडरने मात्र नफ्याचा षट्कार ठोकला आहे..कसा?.- क्रिकेटची मॅच म्हणजे दोन संघ, लाखो प्रेक्षक आणि जिंकणे किंवा हारणे.. एवढे साधे प्रमेय आहे. पण इंडियन प्रीमियर लिगच्या आगमनानंतर या प्रमेयाचा विस्तार अर्थकारणाच्या अंगाने झाला किंवा क्रिकेटमधील अर्थकारण अतिशय ठळकपणे समोर आले. किंबहुना, इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेटच्या नव्या आविष्काराने क्रिकेट, त्यातील खेळाडू, प्रेक्षक यांचेही गणित बदलून टाकले. कधी स्वप्नातही वाटणार नाही अशा खेळाडूंना एकत्र एका टीममधून आपण खेळताना पाहिले. स्ट्राईकवर सचिन तेंडुलकर आणि नॉन स्ट्राईक एण्डला ब्रायन लारा ही आणि अशी अनेक स्वप्नवत दृश्य आयपीएलमुळे प्रत्यक्षात दिसली आणि आधीच ग्लॅमरस असलेल्या क्रिकेट या क्रीडा प्रकाराला भरजरी श्रीमंतीचा साज चढला.. कोटय़वधी रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी कंत्रट करणारे आयपीएल फ्रॅन्चायझीचे मालक, कोटय़वधींची स्पॉन्सरशिप देणा-या कंपन्या, प्रक्षेपणाच्या हक्कांचा वाढलेला दर, ब्रँडिंग आणि असं बरंच काही.. पण या सर्वातून खेळापेक्षाही उठून दिसू लागला तो पैसा.. इनमीन आठ संघ, दिग्गज खेळाडू आणि त्यांच्यावर पैसे लावणा-या कंपन्या..एखाद्या क्रीडापटूसाठी खेळाची व्याख्या त्याने जिंकणे किंवा हारणे या मर्यादेत बांधली आहे. खेळ संपतो हार किंवा जीत याची झिंग अथवा दु:ख घेऊन. क्रीडारसिकही आपल्या नित्याच्या कामाला लागतात. नंतर जेव्हा पुन्हा पुढचा सामना येतो, त्यावेळी पुन्हा नवी हुरहुर. सामान्य क्रीडाप्रेमींसाठी खेळाचे गणित हे इतके सोपे!खेळाडू आणि क्रीडारसिक यांच्या पलीकडे या क्रीडाविश्वाशी संबंधित एक मोठे अदृश्य जग आहे. हा खेळ आणि त्या खेळातील प्रत्येक घटक याचा खोलवर परिणाम हा या अदृश्य जगावर होत असतो. आणि ते अदृश्य जग आहे खेळातील अर्थकारणाशी जोडलेल्या लोकांचे ! आजवर दोन देशांपुरत्या सामन्यांत अदृश्य रूपाने वावरणा-या या जगाला आयपीएलमुळे दृश्य रूप आले आणि क्रिकेटमधील अर्थकारणाचा हा चेहरा लोकांच्या समोर येऊ लागला. हा चेहरा आहे आयपीएल कंपन्यांच्या मालकांचा, जाहिरातदारांचा. इंडियन प्रीमियर लीगमुळे क्रिकेटला काय मिळाले हा स्वतंत्र चर्चेचा विषय असेल, पण यामुळे आधीच ग्लॅमरस असलेल्या क्रिकेटमधील अर्थकारणाची भरजरी बाजू लोकांच्या समोर अगदी ठळकपणे आली आणि क्रिकेटमधील जिंकणे अथवा हारणे या ईष्र्येला, जिंकल्यास अधिक पैसे, या घटकाची किक प्राप्त झाली. इथूनच हा सारा खेळ आता अधिकाधिक व्यावसायिक होत चालला आहे. कव्हर ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह किंवा समोरच्या संघातील दिग्गज खेळाडूंचे कच्चे दुवे यांच्यासोबतच आता आयपीएल कंपन्यांमध्ये चर्चा होत आहे ती महसुली उत्पन्न, ब्रँड इक्विटी, स्पॉन्सर्स, नफा या घटकांची. आणि यातूनच या खेळावर अर्थकारणाची पकड अधिकाधिक घट्ट होताना दिसत आहे. इंडियन प्रीमियर लीग ही संकल्पना आपल्याला आता नवी नाही. धावा, चौकार, षटकार, बळी. यांची गणितं या आयपीएलनं पार उलटीपालटी करून टाकली आहेत. यातल्या अर्थकारणाची गणितंही तितकी सोपी नाहीत. सर्वसामान्य माणसं चक्रावून जातील इतका अमाप पैसा त्यात आहे आणि त्याची गणितंही अशीच मती गुंग करणारी आहेत.कसे चालते अर्थकारण? एखादी व्यावसायिक कंपनी ज्या नफ्यातोटय़ाच्या गणिताने चालते त्याच पद्धतीने आयपीएल नामक उद्योग चालतो. आयपीएलची मूळ रचना ही फ्रॅन्चायझी मॉडेलवर आहे. या फ्रॅन्चायझी कंपन्यांनी भरभक्कम अशी ठरावीक रक्कम मोजून बीसीसीआयचा मालकी हक्क असलेल्या आयपीएलची फ्रॅन्चायझी घेतली आहे. बीसीसीआयच्या तिजोरीत ठोक महसूल जमा झाला आणि मग बीसीसीआयने सामन्यांचे शेडय़ुल ठरविणे आणि सामन्यांच्या आयोजनांची जवाबदारी घेत या कंपन्यांना विशिष्ट नियमावलीत व्यावसायिकतेच्या कसोटीवर मुख्यत्यार केले आहे. यासोबत सामन्यांचे टीव्ही हक्क, तिकीट विक्रीतील काही घटक, आयपीएलसोबत जोडू पाहणारे काही ब्रॅण्ड्स आदिंच्या माध्यमातून आयपीएलची तिजोरी भरते. फ्रॅन्चायझींची कमाई कशी होते?फ्रॅन्चायझी कंपन्या आयपीएलच्या खेळाडूंपासून सामन्यार्पयत आणि खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूपासून जे जे विकून किंवा ज्या ज्या साठी जाहिरात घेता येईल त्या प्रत्येकासाठी जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवायची एकही संधी सोडत नाही. पण, याकरिता सर्वप्रथम त्यांना करावी लागते ती गुंतवणूक. आजच्या घडीला या सर्व फ्रॅन्चायझीजनी आपल्या क्रीडा उद्योगासाठी स्वतंत्र कंपन्यांची बांधणी केली आहे आणि त्या अंतर्गत नवी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने आहे ती खेळांडूना कंत्रटापोटी देण्यात येणा-या रकमेची आणि त्यातून निर्माण कराव्या लागणा-या आणि जोपासाव्या लागणा-या ब्रॅण्ड मॅनजमेंटची. एकदा गुंतवणूक झाली की मग मांडणी होते परताव्याच्या गणिताची. हा परतावा त्यांना प्रामुख्याने मिळतो तो मॅच जिंकून मिळणा-या पैशाच्या रूपाने, तिकीट विक्री, जाहिरातदारांच्या रूपाने, संघातील स्टार खेळाडूंच्या अंगावर सजणा-या विविध लोगोंमार्फत मिळणा-या जाहिरातीच्या एण्डोर्समेंटमधून, तसेच संघाच्या कॅप्स, संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी करून दिलेल्या जर्सी, डिजिटल कण्टेट यामुळेदेखील संघाचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. जर सध्याच्या आयपीएल संघाच्या टीमच्या उलाढालीच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर शाहरुख खानच्या केकेआरच्या संघाने तब्बल 168 कोटी रुपयांची उच्चंकी उलाढाल केली आहे. प्रत्यक्ष मैदानावर आणि टीव्हीच्या माध्यमातून लाखो लोक ही मॅच पाहत असल्यामुळे जाहिरातींचे दर हे कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात. आयपीएल कंपन्यांना मिळणा-या पैशाचे स्नेत निरनिराळे आहेत. पण यापैकी हक्काचे स्नेत सांगायचे तर आयपीएलसाठी बीसीसीआयला जी स्पॉन्सरशिप मिळते त्यापैकी जवळपास 60 टक्के रक्कम ही बीसीसीआयतर्फे आयपीएल फ्रॅन्चायझी कंपन्यांना वितरित केली जाते. ही रक्कम फ्रॅन्चायझी कंपन्यांच्या उत्पन्नाचे हक्काचे साधन आहे. याखेरीज आयपीएलच्या सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी टीव्ही कंपन्यांनी जे हक्क विकत घेतले आहेत, त्याची मोठी रक्कम बीसीसीआयला मिळाली असून, यातील काही टक्केवारीही या कंपन्यांमध्ये वितरित केली जाते. हादेखील फ्रॅन्चायझी कंपन्यांना मिळणारा हक्काचा पैसा आहे. बीसीसीआयकडून मिळणा-या या पैशांखेरीज आयपीएल कंपन्या स्वत:च्या पातळीवर जाहिरातदारांचा शोध घेतात. ज्या टीमने यापूर्वी अंतिम फेरी जिंकली आहे किंवा त्यांचे साखळी सामन्यांतील रेकॉर्ड तसेच कोणत्या संघात किती स्टार खेळाडू आहेत यानुसार जाहिरातींचा दर वाढत जातो. याखेरीज जर संघाने सामना जिंकला तर त्यांना बक्षिसापोटी मिळणारी रक्कमही भरघोस असते. उदाहरणानेच सांगायचे तर यंदाच्या वर्षी अंतिम विजेत्याला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल, तर उपविजेत्याला 11 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. शाहरुखच्या ‘केकेआर’चा ब्रॅण्डआयपीएल सामन्यांच्या सुरुवातीपासून 2013 पर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेतला तर लक्षात येते की, 2013 पर्यंत कोणत्याही संघाला आर्थिकदृष्टय़ा फारसा फायदा झालेला नाही किंवा नफा झालाच नाही. पण 2013 चे वर्ष अपवाद ठरले आणि यावर्षी शाहरुख खान यांच्या केकेआरला नऊ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. त्यानंतर मग पुढच्यावर्षी शाहरुख खानच डॉन ठरला आणि 2013 च्या तुलनेत 2014 या वर्षात महसुलात 30 टक्क्यांची वाढ नोंदवतानाच 14 कोटी 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्याने कमावला. यानंतर दुसरा क्रमांक पटकावला तो प्रीती झिंटा यांच्या मालकीच्या पंजाब इलेव्हनने. त्यांच्या निव्वळ नफ्याने 12 कोटी 76 लाख रुपयांना स्पर्श केला आहे. आजवर तोटय़ात जाणा-या या आयपीएलमध्ये नफ्याचा शिरकाव झाला तरी कसा, हा एक अतिशय वेगळा आणि रंजक मुद्दा आहे. जाणकारांनी याचे विश्लेषण करताना सांगितले की, मुळात पारंपरिक क्रिकेटपेक्षा आयपीएलच्या क्रिकेटचे गणित हे ग्लॅमरचे मॅट्रिक्स समजून घेऊन सोडवावे लागते. आयपीएल फ्रॅन्चायझीचे सर्व मालक हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रतील दिग्गज आहेत. पण यापैकी शाहरुख आणि प्रीती ङिांटा वगळता अन्य कोणतेही मालक स्वत:ची ब्रॅण्ड इक्विटी त्यांच्याइतकी पणाला लावत नाही. स्वत: शाहरुख खान स्पॉन्सर्सचे लोगो असलेले कपडे घालून सामन्याच्या काळात मैदानात सक्रिय असतो. 70 एमएम स्क्रीनच्या ऐवजी क्रिकेटच्या मैदानावर असला तरी शाहरुख खान स्टार आहे, हे विसरता येणार नाही. त्यात जर तो स्पॉन्सर्सचे लोगो घालून मैदानात असेल तर आणि शाहरुख मैदानात असल्यामुळे त्याच्यावर जर कॅमेरा नियमितपणो राहत असेल तर स्पॉन्सर्स कंपन्यांसाठी ही पर्वणीच आहे किंबहुना याकरिता स्वत:चे बजेट वाढवायलाही त्या कुचरत नाहीत. नेमकी हीच बाब शाहरुखने हेरली आहे. मालकांची गणितं ब्रॅण्ड इक्विटीचीप्रामुख्याने या आयपीएल कंपन्यांच्या मालकांकडे जर आपण नजर टाकली तर ते देशातील अव्वल उद्योगपती आणि अव्वल दर्जाचे सेलिब्रिटी असल्याचे दिसते. आता याच लोकांनी यामध्ये गुंतवणूक का केली असेल? तर त्याचे उत्तर सोपे आहे. सध्या आयपीएल फ्रॅन्चायझी असलेल्या कोणत्याही मालकाने आपल्या मूळ कंपनीच्या अथवा मूळ ब्रँड नावाने आपली आयपीएल फ्रॅन्चायझी सुरू केलेली नाही, तर वेगळ्या नावाने ही कंपनी सुरू केली आहे. किंबहुना आपल्या संघाला ते नाव दिले आहे. पण हे करताना सर्व मालकांनी स्वत:ची ‘आयडेण्टिटी’ ही ब्रँड बिल्डिंगसाठी वापरली आहे. हा खेळ, यातील खेळाडू आणि लाखो प्रेक्षकसंख्या यांचा विचार करत, या सर्वात ‘वैयक्तिक पातळीवर होणारे ‘ब्रँड बिल्डिंग’ करायचे झाले तर आता या कंपन्यांकरिता जितका पैसा टाकला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पैसा खर्च करावा लागला असता. त्यामुळे या पैशातून होणारे ब्रँड बिल्डिंग हे या मालकांच्या दृष्टीने ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ आहे. पण निव्वळ ब्रँड इक्विटी तयार करून, उद्योगाच्या भाषेत जर ‘एन्कॅश’ करता आली नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही, आणि म्हणूनच इथून सुरू होतो सर्व खटाटोप !