खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाने बोलावले; अमोल कीर्तिकरांनी केली होती याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 04:20 PM2024-07-29T16:20:13+5:302024-07-29T16:34:31+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना समन्स बजावले आहे.

एनडीएच्या खासदाराचा अल्प मतांनी विजय हा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना खासदार रवींद्र वायकर आहेत.

लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या वायव्य मतदारसंघातून अवघ्या ४८ मतांनी विजय मिळवून खासदार झालेल्या रवींद्र वायकर यांना उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे.

ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यामुळे खासदार रवींद्र वायकर अडचणीत आले आहेत. वायकर यांचा बाजूने दिलेला निकाल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कीर्तिकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कीर्तीकर यांनी त्यांच्या याचिकेत केलेल्या दाव्यांचे उत्तर देण्यासाठी वायकर आणि इतर प्रतिवादींना २ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहावे लागेल, असे खंडपीठाने म्हटलं आहे.

अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कामात त्रुटी असल्याचा आरोप केला होता. मतांच्या पुन्हा मोजणी करण्यासाठी अर्ज दाखल करू दिला नाही असा आरोप कीर्तिकर यांनी केला होता.

कार्तिकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्यांच्या मतमोजणी एजंटांना वैधानिक आवश्यकता असूनही त्यांना रिटर्निंग ऑफिसरच्या टेबलावर बसू दिले गेले नाही.

अमोल कीर्तिकर यांनी वायकर यांची निवडणूक रद्दबातल ठरवण्यासाठी आणि याचिकाकर्त्याला १८व्या लोकसभेवर रीतसर निवडून आल्याचे घोषित करण्याचे निर्देश कोर्टाकडे मागितले आहेत.